बेळगाव लाईव्ह:बळ्ळारी नाल्याचे सर्वेक्षण करून नाल्यामध्ये झालेली अतिक्रमणे हटवून अरुंद झालेल्या या नाल्याचा लवकरच विकास केला जाईल असे आश्वासन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज दिले.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे शेत पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भर पावसात बळ्ळारी नाला परिसराला भेट दिली.
शहरातील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील ब्रिजच्या ठिकाणी दिलेल्या या भेटीप्रसंगी पाऊस असल्यामुळे पालकमंत्री जारकीहोळी यांनी आपल्या गाडीतून उतरून छत्री घेऊन ब्रिजवरून जातीने नाल्याची पाहणी केली. त्यावेळी शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर, कीर्तीकुमार कुलकर्णी, मनोहर हलगेकर आदींसह उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्र्यांना बळ्ळारी नाल्याच्या पुराच्या समस्येची आणि नाल्यात झालेल्या अतिक्रमणाची माहिती दिली.
ती माहिती ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी लवकरच सर्वप्रथम सर्वेक्षण करून नाल्यात झालेले अतिक्रमण हटविण्यात येईल. त्यानंतर गाळ, झाडेझुडपे हटवून अरुंद झालेल्या या नाल्याचा व्यवस्थित विकास साधला जाईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी मंत्र्यांसमवेत शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ व महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह संबंधित अन्य अधिकारी, अभियंते उपस्थित होते. मुसळधार पाऊस असल्यामुळे जिल्हा पालक मंत्र्यांनी नाल्याचा पाहणी दौरा थोडक्यात आटोपता घेतला.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर, मनोहर हलगेकर, अमोल देसाई, कीर्तीकुमार कुलकर्णी, माधुरी बिर्जे, लक्ष्मण बाळेकुंद्री, शशिकांत पाटील, संतोष शिवनगेकर, किरण सायनाक आदींसह बळ्ळारी नाला परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
जिल्हा पालक मंत्र्यांनी थोडक्यात का होईना आज बळ्ळारी नाल्याची पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी मंत्र्यांनी दिलेली आश्वासने आश्वासनेच राहू नयेत, अशी अपेक्षा ही व्यक्त केली जात आहे.