बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन 17 सप्टेंबर रोजी होणार असून श्री गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनगोळसह शहरातील अन्य संवेदनशील भागात आज सकाळी ब्लॅक कमांडो स्पेशल फोर्स आणि पोलिसांचे पथसंचलन काढण्यात आले.
बेळगाव शहरांमध्ये यंदा सुमारे 378 सार्वजनिक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून त्यांचे विसर्जन येत्या 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने गर्दी करत असतात.
मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद सणानिमित्तची मिरवणूकही शहरात काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहराच्या संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.
त्याचबरोबर आज शुक्रवारी सकाळी संवेदनशील भागांमध्ये पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या नेतृत्वाखाली ब्लॅक कमांडो पथक आणि पोलिसांचे पथसंचलन काढण्यात आले.
डोक्यावर सफेद शिरस्त्रान आणि संपूर्ण काळ्या गणवेशातील शस्त्र सज्ज ब्लॅक कमांडोचे लक्षवेधी पथसंचलन संबंधित संबंधित मार्गावरील नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय झाल्याचे पहावयास मिळत होते.