बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात मास्टर प्लॅन करण्यास अनेकदा स्थानिक नागरिकांचा विरोध आपण पाहिला आहे मात्र सध्या बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील भातकांडे गल्लीत रस्ता रुंदीकरणास गल्लीतील बहुतांश नागरिकांनी पाठिंबा द्यायचे चित्र दिसत आहे.
शहरातील भातकांडे गल्लीतील रस्ता रूंदीकरणाला गल्लीतील बहुतांश नागरिकांनी पाठिंबा दिल्यामुळे लवकरच हा रस्ता रूंदीकरणाचा प्रस्ताव आमदारांना सादर करण्यात येणार असून शक्य तितक्या लवकर रुंदीकरण व्हावे यासाठी पाठपुरावाही केला जाणार आहे.
बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भातकांडे गल्लीतील नागरिकांच्या काल सोमवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय एकमताने घेण्यात आला. गल्लीतील रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
दैनंदिन जीवनात अरुंद रस्त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय, व्यापाऱ्यांना होणारा त्रास, वाहतूक कोंडी इत्यादी विषयांवर चर्चा करताना उपस्थितांनी आपापली मते मांडली. रस्ता रूंदीकरणाबाबत भातकांडे गल्लीतील नागरिकांची मतं आणि रूंदीकरणाचे स्वरूप चर्चेद्वारे जाणून घेण्यात आले. यावेळी रस्ता रूंदीकरणाला गल्लीतील 90 टक्के नागरीकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता लवकरच हा रस्ता रूंदीकरणाचा प्रस्ताव आमदारांना सादर करण्यात येणार आहे.
बैठकीअंती शक्य तितक्या लवकर भातकांडे गल्लीतील रस्त्याचे रुंदीकरण आम्ही करून घेऊ, असे आश्वासन गल्लीतील प्रमुख नागरिक दयानंद कंग्राळकर, विजय मुचंडीकर, मल्लाप्पा भातकांडे, गजानन धामणेकर, शिवाजी भातकांडे, संजय बेळगावकर, महेश नागोजीचे, संजय पवार, विनायक भरडे, सागर भातकांडे आणि विक्रम भातकांडे यांनी गल्लीतील रहिवाशांना दिले. याप्रसंगी स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.