बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेला भोवलेले बहुचर्चित २० कोटींचे भरपाई प्रकरण आणि त्यानंतर अनेक प्रकरणांना फुटलेले तोंड यामुळे आता महानगरपालिकाच बरखास्त का करू नये? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. आज सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, राजकुमार टोपाण्णावर आणि ऍड. नितीन बोलबंदी यांच्या नेतृत्वाखाली बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी. बी. रोड पर्यंतचा रस्ता अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला असून रस्त्याच्या कामकाजासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीच्या भरपाईची रक्कम जनतेच्या माथी न मारता बुडा, मनपा आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यातून वसूल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या रस्त्यांपैकी ६०० मीटर लांबीच्या रस्त्यासाठी ७ कोटी २ लाख रुपये खर्च करण्यात आले असून सदर निधी तातडीने मनपाला जमा करण्यात यावा, यासाठी १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यासंदर्भात उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल का करू नये असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेत आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा मांडण्यात आला असून मनपाचे बरखास्त का करू नये? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. बेळगाव महापालिकेत सध्या भाजप सत्तेवर आहे.
सत्तारूढ पक्षाने 20 कोटी रुपये देण्याचा ठराव करून जनतेच्या पैशांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात असल्याची प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.