बेळगाव लाईव्ह :कुराणात जे नमूद आहे तेच सांगणाऱ्या महाराष्ट्रातील संत रामगिरी महाराज यांना श्रीराम सेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. महाराजांच्या वक्तव्य चुकीचं वाटत असेल तर मुसलमानाने न्यायालयात जावं. त्याऐवजी जर आमच्या हिंदू संत-महात्म्यांबद्दल अश्लील, अभद्र भाषा वापरल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. त्यासाठी वेळ आली तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू, असा इशारा श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला.
बेळगाव शहरातील सर्किट हाऊस येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रमोद मुतालिक सांगितले हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या काळात श्रीराम सेना, बजरंग दल यांचे पूजा साहित्य व इतर गोष्टींचे स्टॉल उभारले जातील.
आज-काल निवडणुकीत यश मिळवण्यासाठी हिंदुत्वाबद्दल बोलून हिंदू समाजाचा वापर केला जातो. मात्र त्यानंतर हिंदू समाजाचे रक्षण असो किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील अन्याय त्यांच्यावर दाखल केले जाणारे गुन्हे, खटले यांच्या बाबतीत कोणीच विचार करत नाही. अलीकडेच उदाहरण द्यायचे झाल्यास हुबळीमध्ये नेहा हिरेमठ या मुलीचे खून प्रकरण घडले. त्यानंतर हिंदू युवती, महिलांच्या बाबतीत तशा अनेक घटना घडल्या तरी भाजपचे आमदार व खासदार मूग गिळून गप्प बसले आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेणे सांत्वन करणे त्यांच्या बाजूने आवाज उठवणे यापैकी काहीही त्यांनी केलेलं नाही. याचा अर्थ निवडणुकीपुरतेच यांना हिंदुत्व आठवते, हिंदू समाज आठवतो. मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. हिंदूंचे संरक्षण, हिंदू मुलींवरील अत्याचार थांबवणे, हिंदू कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे यासाठी आम्ही तुमच्या घरासमोर बसू. आम्ही हिंदूंनी तुम्हाला मतं घातली आहेत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुम्ही निरंतर हिंदूंच्या पाठीशी राहावं यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहील, असे मुतालिक यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशातील हिंदूंना संरक्षणा देण्याच्या बाबतीत पंतप्रधान मौन बाळगत असल्याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये लढाई करून पाकिस्तानची फाळणी करण्याद्वारे बांगलादेशाची निर्मिती केली. थोडक्यात भारतानेच बांगलादेशाची निर्मिती केली आहे. त्यामुळे तेथील माजी पंतप्रधान शेख हसीनाला ज्याप्रमाणे राज्याश्रय, संरक्षण देण्यात आले आहे, तसे तेथील हिंदू समाजाला हिंदूंना देखील देण्यात यावे.
बांगलादेशातील हिंदूंवर अन्वयीत अत्याचार असून मंदिरा उध्वस्त केली जात आहेत. शाळा -महाविद्यालयांवर हल्ले होत आहेत. हिंदूंवरील अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे इंदिरा गांधींच्या वेळी जसे युद्ध करावे लागले तसे युद्ध पुकारून आपल्या देशाने बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण मिळवून द्यावे, असे परखड मत प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेस श्रीराम सेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.