बेळगाव लाईव्ह : मुडा प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात राज्यपालांनी खटला चालविण्यासाठी दिलेल्या परवानगीविरोधात दाखल करण्यात आलेली रिट याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी एकंदर प्रकरणाबाबत ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, या राजकीय संघर्षात राज्यातील जनता माझ्या पाठिशी आहे. त्यांचे आशीर्वाद माझे रक्षण करतील. माझा कायदा आणि संविधानावर विश्वास आहे. या लढ्यात अखेर सत्याचाच विजय होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.
ते पुढे म्हणतात, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पैलू मला माध्यमांतून कळले. न्यायालयाने दिलेला आदेश सविस्तर वाचून प्रतिसाद देईन. कलम २१८ अन्वये राज्यपालांनी दिलेला आदेश न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्तींनी केवळ राज्यपालांच्या आदेशाच्या कलम 17A पुरते मर्यादित ठेवले. मी चौकशी करण्यास मागेपुढे पाहणार नाही. कायद्यानुसार अशा तपासाला परवानगी आहे की नाही याबाबत मी तज्ञांशी सल्लामसलत करेन. तसेच कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून लढ्याची रूपरेषा ठरवेन, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कायद्याच्या कलम भादंवि 218 , 17A आणि 19 PC अंतर्गत तपास आणि खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. तथापि, राज्यपालांनी सुरुवातीला 19 पीसी कायद्यानुसार खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. या दिवशी माननीय न्यायालयाने भादंवि च्या कलम 218 अंतर्गत राज्यपालांनी दिलेली खटला चालवण्याची परवानगी स्पष्टपणे नाकारली. येत्या काही दिवसांत सत्य बाहेर येईल आणि 17A अन्वये होणारा तपास रद्द होईल, असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरुद्धचा हा लढा आहे. भाजप आणि जेडीएसच्या या सूडाच्या राजकारणाविरुद्ध आमचा न्यायालयीन संघर्ष सुरूच राहील. माझा न्यायालयावर विश्वास आहे. आमच्या पक्षाचे सर्व आमदार, नेते आणि कार्यकर्ते आणि काँग्रेस हायकमांडने माझ्या पाठीशी उभे राहून कायद्याचा लढा सुरू ठेवण्यासाठी मला प्रोत्साहन दिले आहे. भाजप आणि जेडीएसने माझ्याविरुद्ध राजकीय सूड उगवला आहे. कारण मी गरीब समर्थक आहे आणि सामाजिक न्यायासाठी लढत आहे. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात मी अशा सूडाच्या, षडयंत्राच्या राजकारणाचा सामना केला असून राज्यातील जनतेच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी जिंकत आलो आहे. लोकांच्या आशीर्वादाच्या बळावर ही लढाई मी जिंकेन, असा विश्वास आहे.
मुडा प्रकरण हा केवळ दिखाऊपणा आहे. भाजप आणि जेडीएस पक्षांचा मुख्य उद्देश आमच्या सरकारच्या गरीब आणि पीडितांच्या हिताच्या योजना बंद करणे हा आहे, मी राज्यातील जनतेला विनंती करतो की, मुडा प्रकरण निर्माण करून खोटे आरोप करणाऱ्यांचे चेहरे पहा. जे नेते माझा राजीनामे मागत आहेत, तेच नेते आहेत ज्यांनी राज्यातील गरीब आणि पीडितांसाठी राबवलेल्या योजनांना विरोध केला. त्याच भाजप आणि जेडीएस नेत्यांनी अन्नभाग्य, क्षीरभाग्य, विद्यासिरी, कृषिभाग्य, पशुभाग्य यांना विरोध केला. माझ्या कार्यकाळात इंदिरा कॅन्टीनच्या योजना राबवल्या. जे नेते आज माझ्या विरोधात कट रचत आहेत त्यांनीच एससीएसपी / टीएसपी कायद्याला विरोध केला आहे. भाजपने आतापर्यंत ऑपरेशन कमळ राबवून अनैतिक रित्या सत्तेत आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने ‘ऑपरेशन कमळ’ला एकही संधी न देता आमच्या पक्षाला १३६ सदस्यांचे संख्याबळ दिले, त्यामुळे हताश झालेल्या भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनाचा गैरवापर करून माझ्यावर खोटे आरोप केले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशभरात राजभवनाचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या सरकारला शिक्षा करण्याचे कारस्थान करत आहे. माझ्या बाबतीतही असेच कारस्थान सुरु असून ‘सत्यमेव जयते’ या घोषवाक्यावर माझा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी स्पष्ट केले आहे.
यावर डी के शिवकुमार काय म्हणाले
बेळगाव लाईव्ह : मुडा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेली रित याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर राजकीय पातळीवर प्रतिक्रियांना ऊत आला असून याप्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, मुडा प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांविरोधात कोणतीही चौकशी केली तरी ते निर्दोषच बाहेर येतील.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. कितीही तपास केला तरी तपासाअंती मुख्यमंत्री या प्रकरणी स्वच्छ असल्याचेच निष्पन्न होईल. न्यायालयाने आदेशात काय नमूद केले आहे हे मी पडताळून पाहीन.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कितीही राजकीय षडयंत्र रचण्यात आले तरी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी काहीही चुकीचे केले नाही.
माझ्याविरोधातही असाच कट रचण्यात आला. तुरुंगात पाठविण्यासाठी कट रचण्यात आला. आता मुख्यमंत्र्यांबाबतही असाच प्रकार सुरु असून या प्रकरणातून मुख्यमंत्री निर्दोषच बाहेर येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला.