बेळगाव लाईव्ह :20 कोटी नुकसान भरपाई प्रकरणी चर्चेत आलेल्या वादग्रस्त शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड पर्यंतच्या रस्त्याची 21.65 गुंठे जागा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून आज शनिवारी प्रांत अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत मूळ मालक बी. टी. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जागा हस्तांतरण प्रक्रियेनंतर हा रस्ता कायमस्वरूपी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. शहरात पहिल्यांदाच एखाद्या रस्त्यासंदर्भात या पद्धतीने इतकी मोठी कारवाई झाली असून बेळगाव महापालिकेसह समस्त शहरासाठी ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार आज शनिवारी सकाळी शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड पर्यंतच्या रस्त्याची 21. 65 गुंठे जागा मूळ मालकाला परत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. त्यासाठी महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी , स्मार्ट सिटीच्या एमडी आफरीन बानो यांच्यासह प्रांताधिकारी व संबंधित इतर अधिकारी सकाळी जागेच्या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी मूळ मालक बी. टी. पाटील यांची भेट घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीररित्या जागा परत करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले.
त्यानंतर रहदारी पोलिसांनी सदर रस्ता बॅरिकेट्स घालून वाहतुकीसाठी बंद केला. त्याचबरोबर या ठिकाणी “कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निर्देशानुसार 21.65 गुंठे जमीन बेळगावचे प्रांताधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी मूळ मालक बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहे” अशा आशयाचा ठळक फलक उभारण्यात आला आहे. या पद्धतीने संबंधित जागा मूळ मालकाला परत करण्यात आली असून सदर रस्ता हा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. या पद्धतीने गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेला हा रस्ता अखेर बंद झाला आहे. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड आणि महापालिकेच्या माध्यमातून गेल्या 2019 मध्ये शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड पर्यंतच्या या रस्त्याची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी बीटी पाटील यांच्या मालकीच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. तथापि चुकीच्या पद्धतीने केली गेलेली भू-संपादन प्रक्रिया तसेच विसंगत नुकसान भरपाईच्या विरोधात पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जमीन मालक बीटी पाटील यांना 20 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावला होता. मात्र ही नुकसान भरपाई देण्यास असमर्थता दर्शवून बेळगाव महापालिकेने त्याऐवजी रस्त्यासाठी भूसंपादित केलेली जागा परत करण्याचा पर्याय निवडला होता. यासंदर्भात गेल्या मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी शहापूर येथील रस्त्यासाठी घेतलेली जागा मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत दिली जावी असा आदेश उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बजावला. तसेच जागा परत न दिल्यास महापालिका आयुक्त व प्रांताधिकार्यांवर 5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.
याखेरीस त्यांच्या सेवापुस्तिकेत याबाबतचा शेरा नमूद केला जाईल, असा इशाराही दिला होता. त्याचप्रमाणे जागा परत देताना पोलीस बंदोबस्त तैनात केला जावा. जागा परत देण्यास प्रतिवादी किंवा अन्य कोणीही विरोध केल्यास त्यांना तात्काळ अटक केली जावी व जागा परत देण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना आपल्या ताब्यात ठेवावे, असा आदेशही न्यायालयाने बजावला होता. न्यायालयाच्या या आदेशानुसार अंमलबजावणी करत अखेर आज शनिवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्तात जमीन मालक बी. टी. पाटील यांना त्यांची जागा परत करण्याची प्रक्रिया सुरळीत पार काढण्यात आली. या पद्धतीने कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या शहरातील प्रमुख रस्त्याची जागा मूळ मालकाला परत करून रस्ता वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्याची बेळगाव शहराच्या इतिहासातील ही पहिलीच घटना तर आहेच शिवाय देशातीलही पहिलीच घटना असावी.
दरम्यान गेल्या 5 वर्षापासून रहदारीस खुला झालेला शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर पासून जुना पी. बी. रोडला जोडणारा रस्ता अवजड वाहतुकीसाठी सोयीचा झाला होता. या रस्त्यावर ट्रक, डंपर वगैरे अवजड वाहनांसह दररोज जवळपास 500 टँकर्सची ये-जा असायची. आता हा रस्ता कायमस्वरूपी बंद झाला असल्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या संबंधित सर्व वाहनांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. जुना पीबी रोड येथून एसपीएम रोडकडे जाणाऱ्या लोकांना पूर्वीप्रमाणे रूपाली थिएटर येथून गजाननराव भातकांडे हायस्कूल शाळेसमोरील रस्ता आणि होसूर येथील रस्त्याचा पर्याय अवलंबावा लागणार आहे.
त्याचप्रमाणे सदर रस्त्यावरून होणारी अवजड वाहनांची विशेष करून त्या सुमारे 500 टँकर्सची सोयीच्या अन्य मार्गाने होणार असल्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण वाढणार असून वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये भर पडणार आहे परिणामी या प्रकारामुळे रहदारी पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.