बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरवड्यात नियमबाह्य भूसंपादन प्रकरणी मनपाला झेलाव्या लागलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भरपाईचे प्रकरण ताजे असतानाच आता शहापूरच्या हुलबत्ते कॉलनीत जमीन संपादित केल्याप्रकरणी विस्थापितांना भरपाई न दिल्याने, जागामालकाने उच्च न्यालयात धाव घेऊन याप्रकरणी न्याय मिळविला आहे.
उच्च न्यायालयाने महापालिकेला विस्थापित मालमत्ताधारकाला ७५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र, महापालिकेकडून जमीन मालकाला भरपाई देण्यात आली नाही. नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिल्यानंतर मालमत्ता जप्त करण्यासाठी आलेल्या जमीनमालकाला येथील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याची घटना मंगळवारी घडली.
मनपाच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त करत, न्यायालयाच्या आदेशही डावलल्याने मनपा उपायुक्तांच्या वाहनालाच नोटीस चिटकविण्यात आली आहे. यासंदर्भात वकील इंद्रजित बडवाण्णाचे यांनी अधिक माहिती दिली आहे. शहापूरच्या हुलबत्ते कॉलनीत १५ वर्षांपूर्वी महापालिकेने जमीन संपादित केली होती. याविरोधात आम्ही हायकोर्टात लढा दिला आणि महापालिकेला 75 लाखांची भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून मनपाने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा येथील वस्तू जप्त करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा ते न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल, असे ते म्हणाले.
३ वर्षात सदर विस्थापितांच्या ५ जमिनी संपादित करण्यात आल्या असून न्यायालयात धाव घेऊन, न्यायालयाचा आदेश येऊनही मनपाने याकडे दुर्लक्ष केले, शिवाय यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले असता कोणीही दाद न दिल्याने आपण हि कारवाई केली, असे विस्थापित जागामालकाने सांगितले.