बेळगाव लाईव्ह : श्री गणेशमूर्तीच्या उंचीचा ट्रेंड जसजसा रुजत गेला तसतसा मूर्ती बनविण्यासाठी शाडूचा वापर कालबाह्य ठरत गेला. शाडूच्या जागी पीओपीने जागा घेतली आणि परिणामी पर्यावरणाला याचा फटका बसू लागला. मात्र या प्रकाराला बगल देत बेळगाव मधील नानावाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सवाने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची सुरु केली आणि आजतयागयात हि परंपरा सुरूच आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रुद्राक्ष, फुले यासह विविध पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून मूर्ती बनविणाऱ्या या गणेशोत्सव मंडळाने यंदा आगळीवेगळी पर्यावरणपूरक मूर्ती बनविली असून या मूर्तीकडे पाहिल्यास पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहे, हे कदापिही कळून येत नाही. बांबू, काठ्या, रद्दी, बारदान, (पोती), खडू पावडर, डिंक यासारख्या वस्तूंपासून बनविलेली श्री गणेशमूर्ती तब्बल ७ महिन्यांपासून आकार घेत होती.
मुंबई येथील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकाराकडून जानेवारी महिन्यापासूनच या मूर्तीची तयारी सुरु करण्यात आली. माजी नगरसेवक दयानंद कारेकर यांच्या संपर्कातील मुंबईतील पर्यावरणपूरक मूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकाराने आजवर अनेक पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या आहेत. याच अनुषंगाने नानावाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने त्यांच्याकडे श्रीमूर्तीची ऑर्डर दिली, आणि आज हीच श्रीमूर्ती बेळगावमधील गणेश भक्तांना पाहता येणार आहे.
गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नारायण भोसले, उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटील, कार्यकर्ते रवींद्र सावंत यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील श्रीमूर्तीकाराला गाठून अखेर हि मूर्ती तयार झाली असून ९ फूट श्रीमूर्ती बनविण्यासाठी ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागला आहे. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती सुखरूप पद्धतीने बेळगावमध्ये आणण्यासाठी तब्बल ५०० किलोमीटरचा प्रवास पार करून अखेर श्रीमूर्ती नानावाडी येथील गणेशोत्सव मंडळात विराजमान झाली आहे. सहज उचलता येणारी आणि अवघ्या १ ते १.५ तासात विरघळणारी श्रीमूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांची रीघ लागत आहे.
पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि हानी लक्षात घेता बेळगावमधील सर्वच श्री गणेशोत्सव मंडळांनी अशाप्रकारे मूर्ती बनवून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा, असा संदेश श्री गणेशोत्सव मंडळ नानावाडी यांच्यावतीने देण्यात येत आहे.