बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या मातब्बर महिला जलतरणपटू ज्योती एस. कोरी आणि त्यांचा मुलगा विहान एस. कोरी हे दोघे मायलेक येत्या गुरुवार दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी आशियाई विक्रम प्रस्थापित करण्यासाठी आणि महिलांच्या तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता जलतरणातील सर्वात लांब अखंड (नॉन-स्टॉप) रिलेचा पराक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
शहरातील केएलई सुवर्ण जीएनएमसी जलतरण तलावामध्ये गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरी मायलेक जलतरणाचा अखंड रिले करणार आहेत. याप्रसंगी शहरातील मान्यवर मंडळी आणि जलतरणपटूंसह इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत.
बेळगावच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या धाडसी उपक्रमाचा समारोप समारंभ त्याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या वरिष्ठ कर्मचारी असणाऱ्या ज्योती कोरी या मातब्बर महिला जलतरणपटू आहेत.
त्यांनी आजतागायत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये अनेक बक्षीस मिळवून बेळगाव शहराचे नांव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांचा मुलगा विहान हा देखील एक युवा होतकरू जलतरणपटू असून त्यानेही जलतरणात बरीच बक्षिसे मिळवली आहेत.
आता हे मायलेक गुरुवारी रिलेच्या स्वरूपात जास्तीत जास्त अंतर अखंड जलतरण करून नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
तरी क्रीडाप्रेमींसह शहरवासीयांनी आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी जेएनएमसी जलतरण तलाव येथे गुरुवारी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वतः ज्योती कोरी आणि विहान कोरी यांनी केले आहे.