बेळगाव लाईव्ह :”मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची, तुकारामांची, सावरकरांची, ज्ञानेश्वरांची आहे. त्यामुळे या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरातील ज्ञानवंत मातृभाषेचे महत्त्व सांगतात तसे ते आपल्या भाषेलाही आहे. त्यामुळे मराठी भाषेतून शिकणाऱ्यानी मनातला न्यूनगंड काढून टाकावा आणि या भाषेतही ज्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्या स्वीकारून जीवनाच सोनं करावं” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले.
सरस्वती वाचनालय आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या “मराठीचे महत्त्व आणि रोजगाराची दिशा” या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.सरस्वती वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकूर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर मनीषा नेसरकर, मराठी विभाग प्रमुख राणी चन्नम्मा विश्वविद्यालय, वाचनालयाच्या संचालिका अश्विनी ओगले ,माजी अध्यक्ष एम एन करडीगुड्डी व आर पी डी महाविद्यालयाचे प्रा. महादेव खोत हे होते .
अश्विनी ओगले यांच्या स्वागत व प्रस्ताविका नंतर मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. महादेव खोत यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
डॉ. गायकवाड पुढे म्हणाले की “ज्ञानेश्वरांनी अध्यात्मिक लोकशाही आणली. सर्व संत हे मराठीतच लिहीत होते. नामदेव यांनीतर पंजाबी व हिंदीतही लिखाण केले. सीमा भागातील मुले तशी भाग्यवान आहेत कारण त्यांना मराठी बरोबरच कन्नड, इंग्रजी व हिंदी अशा चार भाषा बोलता व शिकता येतात. मनावरचे दडपण काढून टाकून मुलानी फुलायला हवं ,जीवन चैतन्याने भरलेलं असायला हवं तर मातृभाषेवर प्रेम करा.
आपला जन्म हा काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी आहे. याची जाण ठेवा. यासाठी पहाटे उठून कामाला लागा. मराठी भाषांतरकाराच्या अनेक संधी वृत्तपत्रे, सरकारी कार्यालय, न्यूज चॅनल्स आदी ठिकाणी उपलब्ध आहेत “असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना मनीषा नेसरकर म्हणाल्या की, अधिकाधिक भाषा येणे ही आजची खरी गरज आहे. सुसंस्कृत समाज निर्माण करायचा असेल तर भाषा समृद्ध करण्याची गरज आहे .अनेक कलांचं, साहित्यांचे माध्यम म्हणून भाषेकडे पाहिले जाते.अनेक मोठ्या व्यक्ती साहित्याने प्रभावित होऊन मोठ्या झाल्या आहेत .आपण भौतिक दृष्ट्या समृद्ध झालो पण मानसिक शांतता नाही .अराजकता वाढली आहे. खून, बलात्कार, मारामाऱ्या हे सांस्कृतिक अराजकता माजवीत आहेत त्यावरचे उपाय म्हणजे साहित्य आहे. साहित्य तुमच्या जीवनाला नक्कीच दिशा देऊ शकते.” भाषेचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या अनेक संधी बद्दलची माहिती दिली. यूपीएससीची अंतिम परीक्षा ही मराठीतून देता येते हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारले आणि एक दिलखुलास चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत अनुजा ,अनंत लाड ,यांच्यासह अनेकांनी भाग घेतला. महादेव खोत यांनी सूत्रसंचालन तर प्रा. सोनाली कांगले यांनी आभार प्रदर्शन केले.या प्रसंगी डाॅ मैजुदिन मुतावली,डाॅ संजय कांबळे व विविध महाविद्यालयातील मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व शिक्षक वर्ग याप्रसंगी उपस्थित होते.