बेळगाव लाईव्ह :दरवर्षी श्री गणेशोत्सवात उंदरीच्या निमित्ताने खानापूरमध्ये वर्षातून एकदा भरणारा आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणारा बकऱ्यांच्या खरेदी -विक्रीचा विशेष मोठा बाजार काल रविवारी पार पडला.
दरवर्षी श्री गणेशोत्सवात उंदरीच्या निमित्ताने खानापूरमध्ये वर्षातून एकदा बकऱ्यांचा विशेष मोठा बाजार भरतो. त्यानुसार खानापुर नगरातील मुख्य रस्त्याशेजारी न्यायालयापासून कांही अंतरावर असलेल्या श्री मऱ्याम्मा मंदिरासमोरील विस्तीर्ण खुल्या जागेत काल रविवारी सकाळी ही प्रचंड मोठी बकरी मंडई अर्थात बकऱ्यांचा बाजार भरला होता.
सदर बाजारात बकऱ्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळत होते. बकरी, पालवे यांची खरेदी विक्री तेजीत सुरू होती. यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना बोलताना एका बकरी मालकाने श्री गणेशोत्सवातील उंदरीच्या निमित्ताने वर्षातून एकदा हा प्रचंड मोठा बाजार भरतो तसेच आजच्या या बाजारात 5000 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत बकऱ्यांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती दिली.
त्यामुळे एकंदर खानापुरातील कालच्या बकऱ्यांच्या बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. खानापूर तालुक्यातील खेड्यापाड्यातून तसेच बैलहोंगल, बेळगाव वगैरे परगावातून या ठिकाणी बकरी विक्रीसाठी आणली जातात. मिळालेल्या माहितीनुसार श्री गणेशोत्सवातील उंदरीसाठी म्हणून खास या बकऱ्यांची पैदास व पालनपोषण केले जाते.
खानापूर येथील या बकरी बाजारात दरवर्षी 8 -10 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र कालच्या बाजारात त्यामानाने कमी उलाढाल झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. येत्या रविवारी उंदरी असल्यामुळे काल झालेल्या बाजारानंतर आता येत्या बुधवारी नंदगड येथे बकऱ्यांचा दुसरा मोठा बाजार भरणार आहे.