बेळगाव लाईव्ह : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयात काल आश्चर्यकारक बाब घडली असून चक्क प्राणिसंग्रहालयातून सिंहच बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी एका विंग मधून दुसऱ्या विंगमध्ये प्राण्यांना हलविण्याचे काम करत असता पिंजऱ्यातून सिंह निसटला. यानंतर घाबरगुंडी उडाल्याने सिंहाचा शोध सुरु करण्यात आला. यादरम्यान पर्यटकांना प्राणिसंग्रहालयात प्रवेश बंदी करण्यात आली.
सुरुवातीला हि अफवा असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र दुपारच्या सुमारास नागरिकांना प्राणिसंग्रहालयात येण्यास प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे या माहितीला दुजोरा मिळाला.
काहींनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडूनही कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. तब्बल तीन किलोमीटर परिसरात सिंहाचा शोध घेण्यात आला आणि अथक प्रयत्नानंतर सिंहाला पकडण्यात यश आले अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
बेळगावमधील वनपरिक्षेत्राच्या आसपास परिसरात गेल्या दोन वर्षात आधीच वन्यप्राण्यांमुळे धास्ती निर्माण झाली आहे. अशातच प्राणिसंग्रहालयाच्या या वृत्तामुळे अनेक चर्चांना ऊत आला.
या वृत्ताची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र हे प्रकरण गुंडाळून का ठेवले गेले? असा प्रश्न आज दिवसभरात उपस्थित होऊ लागला आहे. प्राणिसंग्रहालयातील वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवण्यात अधिकारी कमी पडले की काय, अशी देखील चर्चा सुरू आहे. काल प्राणीसंग्रहालयात काय घडले ते जाहीरपणे सांगावे अशी मागणीही आता होऊ लागली आहे.