बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवादरम्यान राज्यात नागमंगल आणि दावणगेरे येथे निर्माण झालेला गोंधळ हे राज्य सरकारचे अपयश असून काँग्रेसकडून होत असलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचे हे पडसाद असल्याचे मत खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
ते पुढे म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे पॅलेस्टाईन आणि पाकिस्तानचा झेंडा राज्यात फडकावला जात आहे.
आपल्याला जे वाटेल तसेच हे सरकार वागत असून कायदा – सुव्यवस्था बिघडवून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांना काँग्रेस सरकार पाठीशी घालून देशद्रोह्यांना अभय देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुडा आणि वाल्मिकी घोटाळा बाहेर पडल्यानंतर काँग्रेस भाजप नेत्यांसोबत द्वेषाचे राजकारण करत असल्याचाही आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी केला.
यावेळी त्यांनी वंदे भारत रेल्वेसेवेबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. वंदे भारत रेल्वे बेळगाव साठी सुरु करण्यात यावी यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या २३ सप्टेंबर रोजी राज्य रेल्वेमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हुबळी दौऱ्यादरम्यान आपण चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
हुबळी – पुणे रेल्वेसेवेप्रमाणेच धारवाड – बेळगाव रेल्वे सुरु करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती जगदीश शेट्टर यांनी दिली.