बेळगाव लाईव्ह:भारतातील सर्वात मायावी आणि लुप्तप्राय प्रजातींपैकी एक असलेल्या तरस (हायना) या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी बेळगाव येथील वनाधिकारी कर्नाटकातील पहिले पट्टेदार तरस अभयारण्य स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करत आहेत, असे डेक्कन हेराल्डचे वृत्त आहे.
सदर अभयारण्य मंजूर झाल्यास ते राज्याचे पहिले संरक्षित क्षेत्र असेल जे प्रामुख्याने या जंगलातील सफाई कामगाराची भूमिका बजावणाऱ्या या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी समर्पित असेल. जी प्रजाती सध्या देशभरातील कांही मोजक्या अभयारण्यांमध्ये इतर वन्यजीवांसह स्वतःचा अधिवास सामायिक करत आहे.
प्रस्तावित अभयारण्यात बेळगाव आणि गोकाक तालुक्यांच्या सीमेवरील सुमारे 120 चौरस कि. मी. राखीव जंगलाचा समावेश असेल.
वन अधिकाऱ्यांच्या मते, तरस अभयारण्य निर्माण केल्याने या प्रजातींच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना लक्षणीय बळ मिळू शकते. ज्यांना सध्या अधिवासाची हानी, मानव-वन्यजीव संघर्ष आणि कमी होत चाललेला सावजांची तळं यासारख्या गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे.
बागलकोट, बिदर, धारवाड, कोप्पळ, तुमाकुरू, गदग आणि बेळगाव या सारख्या जिल्ह्यांतील उल्लेखनीय अधिवासांसह कर्नाटकातील तरसांची संख्या सातत्याने घटत आहे. संवर्धन तज्ञांच्या मते सौदत्ती, गोकाक, हुक्केरी आणि बेळगाव येथील कोरडी, पानझडी वनक्षेत्र ही राज्यातील तरसांसाठी शेवटची कांही सुरक्षित क्षेत्र आहेत.
बेळगावच्या नियोजित अभयारण्याद्वारे तरसांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या संख्येत होणारी घट रोखण्याची आणि कर्नाटकातील या प्रजातींचे भविष्य शाश्वत सुरक्षित करण्याची आशा वनाधिकारी बाळगून आहेत.