बेळगाव लाईव्ह -” गोरगरीब सभासदांच्या होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची फी भरता यावी या उद्देशाने यापुढे दरवर्षी एक लाख रुपयांची तरतूद आम्ही बँकेच्या बजेटमध्ये करीत आहोत” अशी घोषणा पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी केली.
“118 वर्षाची परंपरा असलेल्या पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने पहिल्यांदाच यंदापासून दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार ही मदत केली जाईल. त्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत” असेही असे अष्टेकर म्हणाले.
पायोनियर बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार चेअरमन व व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन दहावीपासून पदव्युत्तर पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांना तसेच इतर क्षेत्रात नाव कमावलेल्या पाल्यांना गौरविण्यात आले .याप्रसंगी विद्यार्थ्यांना बँकेच्या मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन व निवृत्त शिक्षक अनंत लाड यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
” विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर आदर्श ठेवून, वेळेचा सदुपयोग करून वाटचाल केली तर ते निश्चित यशाप्रती पोहचू शकतील” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
प्रारंभी बँकेच्या सीईओ अनिता मूल्या यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक शिवराज पाटील यांनी केले तर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी सर्व संचालक व विद्यार्थी उपस्थित होते