बेळगाव लाईव्ह:रस्त्यासाठी भू-संपादित केलेली जागा पुन्हा मूळ मालकाला परत करण्याची वेळ बेळगाव महापालिकेवर येणे हा फक्त महापालिकेचा नव्हे तर समस्त बेळगावकर तसेच आम्हा आजी-माजी लोकप्रतिनिधींचा अवमान आहे. तेंव्हा यापुढे तरी अधिकाऱ्यांनी शुद्धीत राहून काम करावे, असे परखड मत माजी महापौर विजय मोरे यांनी व्यक्त केले
शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना धारवाड रोड पर्यंतच्या रस्त्याची कांही जागा महापालिकेने आज शनिवारी पुन्हा संबंधित जमीन मालकाला परत केली. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने भेट घेतली असता ते बोलत होते. माजी महापौर मोरे म्हणाले, प्रशासनाने कोणताही विकास प्रकल्प राबवताना प्रथम जनतेला विश्वासात घेतले पाहिजे.
तसेच अधिकाऱ्यांनी देखील शुद्धीत राहून जागरूकपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किंवा अधिकाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन केल्यामुळे असे प्रसंग निर्माण होतात. मात्र आता शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना धारवाड रोडपर्यंत करण्यात आलेल्या रस्त्यासाठी जे 7 -8 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे ते कोण भरून देणार? जनतेने कराच्या स्वरूपात दिलेल्या पैशातून विकासकामे होत असतात.
स्मार्ट सिटी असो, कॅन्टोन्मेंट बोर्ड, जिल्हा पंचायत, महापालिका असो समाजासाठी काम करणाऱ्या या यंत्रणांनी लोकांना विश्वासात घेऊन विकास कामे केली पाहिजेत. स्मार्ट सिटी व महापालिकेने सदर रस्त्याच्या बाबतीत तसे केले असते तर लोकांचे कोट्यावधी रुपये वाचले असते आणि चांगला रस्ता देखील झाला असता. मात्र आता नेमके उलट झाले आहे.
आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तो रस्ता तर इतिहास जमा झालाच शिवाय खर्च केलेले पैसेही वाया गेले आहेत. आणखी एक भुर्दंड म्हणजे त्या रस्त्याचा वापर करणाऱ्या लोकांना आता पर्यायी दूरच्या मार्गाने भोवाडा घालून जावे लागणार आहे. ज्यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच त्यांना जादा श्रम आणि इंधन खर्च करावे लागणार आहे. एकंदर सर्वांना विश्वासात घेऊन तो रस्ता करण्यात आला असता तर आज महापालिका आयुक्तांवर ती जागा पुन्हा परत करण्याची वेळ आली नसती.
मी महापालिकेत काम केले असल्यामुळे या गोष्टीबद्दल मला अतिशय खेद वाटत आहे. आमच्या महापालिकेचा जर न्यायालयात असा अपमान होत असेल तर तो संपूर्ण बेळगाव शहराचा आणि आम्हा आजी-माजी लोकप्रतिनिधींचा अपमान आहे असे सांगून तेंव्हा यापुढे तरी अधिकाऱ्यांनी शुद्धीत राहून काम करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे, असे माजी महापौर विजय मोरे शेवटी म्हणाले.