बेळगाव लाईव्ह:बेंगलोर येथे दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या झालेल्या अवमानाचा बेळगावमध्ये निषेध केल्याबद्दल पोलिसांनी दाखल केलेल्या दोन्ही खटल्यांमधील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आज बेळगाव तृतीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
बेंगलोर येथे दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून अवमान करण्यात आला होता. सदर घटनेचा त्यावेळी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे जमून जोरदार निषेध केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, भारत मेणसे, नरेश मिरजकर, अंकुश केसरकर, लोकनाथ राजपूत, हरीश मुतगेकर, विनायक कंग्राळकर व मदन बामणे या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवून खटला दाखल केला होता.
सदर खटला क्र. 34 व 36 प्रकरणी न्यायालयाने यापूर्वीच आरोपींचे वकील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. तसेच या खटल्यांचा निकाल आज शुक्रवारी दिला जाईल असे स्पष्ट केले होते.
त्यानुसार अंतिम निकाल जाहीर करताना बेळगाव तृतीय जेएमएफसी न्यायालयाने आज सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. महेश बिर्जे, ॲड. प्रताप यादव आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले.