बेळगाव लाईव्ह : बिल देण्याच्या मुद्द्यावरून हॉटेल मालक आणि गंगेवाडीतील तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना एपीएमसी नजीक असलेल्या आई हॉटेलमध्ये घडली आहे.
पार्टी करून जेवणासाठी आई हॉटेलमध्ये गॅंगवाडी येथील चार युवक आले होते. यामधील तिघांनी आपले बिल भरले मात्र एकाने आपले बिल भरले नाही. यादरम्यान हॉटेल मालक आणि युवकांमध्ये वादावादी सुरु झाली. हॉटेल मालक, कर्मचारी आणि युवकांमध्ये होत असलेला वाद सुरूच राहिला.
याचदरम्यान या हॉटेलमध्ये बीएसएफ जवान देखील जेवणासाठी आला होता. या वादाच्या गोंगाटाने त्रस्त झालेल्या बीएसएफ जवानाने अखेर वाद घालणाऱ्या तरुणाच्या पोटात सूरी खुपसली.
गॅंगवाडी येथील अल्ताफ चौगुले नामक युवक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
युवकाच्या पोटात सूरी खुपसणारा बीएसएफ जवान परशुराम रामगोंडानावर याची हालचाल सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकात संतोष लोंढे यांनी तक्रार दाखल केली आहे. सदर बीएसएफ जवानाला एपीएमसी पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.