बेळगाव लाईव्ह विशेष : असों द्यावा धीर सदा समाधान, आहे नारायण जवळीच! संत तुकारामांनी लिहिलेल्या या पंक्ती अनेक अर्थातून उमगून घेता येतात. आजकाल अनेक सण – उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची प्रथा वाढत चालली आहे. बाराही महिने सुरु असणाऱ्या सणात सणाचा आनंद, नात्यांची गोडी आणि आपुलकी हरवत चालल्याचे जाणवत आहे. गणपती, दसरा, दिवाळी यासोबतच सार्वजनिक समजल्या जाणाऱ्या अनेक सणाच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी दशेतील मुले आणि तरुण गटातील मुले – मुली सर्रास व्यस्त असल्याचे दिसत आहेत.
एकामागोमाग एक सण आणि त्या सणांसाठी महिना – दीड महिना आधीपासून सराव, पूर्वतयारी यासह विविध गोष्टींच्या मागे लागलेला मराठा तरुण. या सर्व गोष्टींमुळे कलागुणांना वाव मिळतो हे जरी खरे असले तरी विद्यार्थी दशेत किंवा ऐन व्यवसायाच्या उमेदीच्या काळात मराठा समाजातील तरुण नियमित दिनचर्या सोडून आपले भवितव्य धोक्यात घालत असल्याचे जाणवत आहे.
मराठा समाजाला आधी शेती व्यवसायाचा कणा होता. मात्र कालांतराने शेती आणि शेतकरी याची संख्या लक्षणीय रित्या कमी झालेली दिसून येत आहे. अशावेळी मराठा समाजातील तरुणांनी इतर व्यवसाय, व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे अधिक लक्ष देऊन आपली प्रगती करणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय यामध्ये पालकांची भूमिकाही महत्वाची आहे.
विविध सार्वजनिक उत्सवांच्या तयारीत व्यस्त असणाऱ्या मराठा समाजातील तरुणांचे अभ्यास आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी कर्जबाजारी, व्यसनाधीनतेकडे, मानसिक अस्वास्थ्याकडे हे सर्वजण वळत आहेत. यामुळे पालकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे नितांत गरजेचे आहे.
स्पर्धात्मक युगात आव्हानेही तितकीच वाढत चालली आहेत. यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणी पालकांनी लक्षात घेत आपल्या मुलांवर वचक ठेवणे, लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सण – उत्सव साजरे करण्यासाठी काहीच हरकत नाही. परंतु ते कितपत साजरे करायचे, कुठे थांबायचे, आपल्या अभ्यासासह, व्यवसायासह आपली संस्कृती कशी टिकवायची, यासोबतच आपली प्रगती दिवसागणिक कशी वाढवायची याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे. दैनंदिन दिनचर्येतून लक्ष भरकटल्याने शाळा, अभ्यास, व्यवसाय याकडेच ओढा मराठा समाजाचा हळूहळू कमी होताना दिसत आहे, हि चिंताजनक बाब आहे.
एकीकडे मराठा समाज प्रगतीपथावर यावा, यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन पेटवणारे जरांगे पाटील, आणि दुसऱ्या बाजूला वाहवत चाललेला मराठा समाज आणि मराठा समाजातील तरुण याचा विचार अंतर्मुख होऊन करणे गरजेचे आहे.
विद्यार्थी दशेतील मुलांनी दर्जात्मक शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षकांकडे आपला ओढा वाढविला पाहिजे.आणि यातून जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी इतर सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. नवनवे व्यवसाय समजून घेतले पाहिजेत. यामध्ये पालकांची भूमिकाही तितकीच जबाबदारीने पार पाडली पाहिजे. सण – उत्सव काळात आपली मुले कुठे जातात? काय करतात? कुठल्या संस्थेसाठी काम करतात? रात्री उशिरापर्यंत आपल्या घरी मुले परतत नाहीत त्यावेळी नेमकी हि मुले कोणते काम करतात? हे पाहणेही गरजेचे आहे.
परंपरा आणि संस्कृती हि टिकवलीच पाहिजे. परंतु यासोबतच आपली प्रगती साधणे देखील गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन वेळेतच सर्व बदल करता आले तर भविष्याचा मार्ग सुकर आहे. अन्यथा हातातून एकदा वेळ निसटली कि हताश होण्यापासून काहीच उरत नाही हे निश्चित आहे.