Tuesday, January 21, 2025

/

मराठा भूमिपुत्राची भूमिहीन दिशेने वाटचाल चिंताजनक!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटातील, ‘शेती ईकायची नसते, शेती राखायची असते,’ हा संवाद खूप गाजला. मात्र केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर हा संवाद आज सीमाभागातील प्रत्येक मराठा समाजातील तरुणाने, शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाने प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून मराठ्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेतीसोबतच गायी – म्हशी जनावरे पळून दुग्धव्यवसाय देखील अनेक मराठा समाजातील नागरिक करत आले आहेत. परंतु काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली शेती परंपरा आणि याचबरोबर जनावरे पाळण्याची परंपरा मराठा समाजासाठी घातक ठरत चालली आहे.

विभक्त कुटुंब पद्धती, भाऊबंदकी यासारख्या असंख्य कारणामुळे शेतीची तुकडेवारी झाली आणि शेती व्यवसायाला फटका बसत गेला. परिणामी अनेकांनी औद्योगिक क्षेत्रात नोकरी, गवंडी काम यासह अनेक कामे निवडली. काही नोकरदार झाले तर काहींनी आपला कौटुंबिक शेती व्यवसाय सोडून इतर व्यवसाय थाटले.

मात्र दुर्दैवाने शेतीकडे बहुतांशी मराठा समाजाचे दुर्लक्ष झाले. शेतजमीन पडीक झाली. पड जमिनीचा वापर होत नाही हे पाहून अनेकांनी शेतजमिनीत प्लॉट जमिनीची व्यवस्था केली. प्लॉट विकले गेले. काहींची जमीन संपली तर काहींची जमीन रस्ते, रिंगरोड, विकासकामांच्या गोंडस नावाखाली हडपली गेली.

जमिनी विकून अमाप पैसे कमविण्याच्या नादात कित्येक कुटुंबांची वडिलोपार्जित शेतीच संपली. शेतजमिनी विकून गाड्या, बंगले ज्या लोकांनी बांधले त्या लोकांकडे आज उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही अशी भीषण परिस्थिती अनेक कुटुंबांवर ओढवली आहे.

निदान विक्री केलेल्या जमिनीच्या पैशातून एखादा व्यवसाय थाटला असता तर जमीनमालकांसोबतच अनेकांना रोजगार मिळाले असते. मात्र भलेमोठे, टोलेजंग बंगले बांधलेल्या लोकांना आज त्याच बंगल्यांची देखभाल करणेही अवघड होऊन बसले आहे. ज्यांनी आज शेती विकली ते लोक उद्या घरे विकण्यासाठीही मागेपुढे पाहणार नाहीत. शेत-जमिनी विकलेल्या लोकांवर आज परागंदा होण्याची वेळ आली असून आता खऱ्या अर्थाने मराठा समाजाने भानावर यायला हवे.

लाखांचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात, हि बाब नाकारून चालणार नाही. उत्पन्नाला मिळणारा भाव, निसर्गाच्या कोपाला द्यावे लागणारे तोंड याही गोष्टी आहेतच. मात्र निसर्गाच्या कोपाला प्रत्त्युत्तर म्हणून कशापद्धतीने शेती करता येईल, याकडेही हल्लीच्या तरुणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.Farmers maratha

एकीकडे शेतमजूर मिळणे कठीण झाले असून अशावेळी जे उत्पन्न मिळते तेही १०० टक्के मिळत नाही. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंपरागत शेतीसोबतच आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. शेतीविषयक उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक प्रयोग राबवून उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे, सध्याची परिस्थिती पाहता आता मराठा समजतील तरुणांनी पुढाकार घेऊन शेती हा विषय अत्यंत जिव्हाळ्याने जपत, याचबरोबर शेती हा विषय आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा बनवणे गरजेचे आहे.

‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ असेही न वागता ज्या शेतजमिनी उरल्या आहेत त्यातून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी शेतीतील विविध प्रयोग करणे गरजेचे आहे. जमीन कसदार असेल तर भविष्य नक्कीच पोसले जाईल यात तिळमात्र शंका नाही, हे आता मराठा समाजातील तरुणांनी ध्यानात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.