बेळगाव लाईव्ह : वीज जोडणीसाठी आधार लिंक करण्याची सक्ती, पंप संचासाठी आकारण्यात येणारे शुल्क याविरोधात आज शेतकऱ्यांनी बेळगावच्या हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालून निषेध नोंदविला. चक्क हेस्कॉम कार्यालयासमोर स्वयंपाक बनवत शेतकऱ्यांनी अभिनव पद्धतीने निषेध नोंदवत निदर्शने केली.
राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनात राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. राज्य सरकारने आधार लिंक चा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याचप्रमाणे आधार क्रमांक लिंक करून कृषी पंप संचांना मीटर बसविण्याचा आणि शुल्क आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय निंदनीय असल्याचे म्हणणे शेतकऱ्यांनी मांडले. हेस्कॉमचे कायदे शेतकऱ्यांसाठी जाचक असून अन्यायकारकदेखील आहेत.
विजेच्या धक्क्यामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना 10 लाखांची नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणीही यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आली. उपरोक्त मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन हाती घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने करत भाजप कार्यकाळात तयार झालेले तीन कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, यावरदेखील भर दिला. जोवर आपल्याला न्याय मिळत नाही तोवर आपण इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
या आंदोलनात शेतकरी संघटना, शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.