बेळगाव लाईव्ह:रात्री मंदिरात होणारा भजनाचा कार्यक्रम आटोपून तेथेच मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या एका व्यक्तीचा ऊस तोडण्याच्या कोयत्याने मानेवर प्राणघातक वार करून भीषण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गोकाक तालुक्यातील ममदापूर गावात उघडकीस आली आहे
खून झालेल्या व्यक्तीचे नांव मद्देप्पा यल्लाप्पा बनासी (वय 47) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार ममदापूर गावातील श्री बीर सिद्धेश्वर मंदिर येथे रात्री भजनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रम आटोपून मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या मद्देप्पा बनासी यांच्यावर त्याच गावातील बिरप्पा सिद्दप्पा सुंदोळी याने मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने जोरदार वार केले. या प्राणघातक हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मद्देप्पाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला. शेतजमिनीच्या सीमारेषेवरून मद्देप्पा आणि बीरप्पा यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला होता.
या वादाचे पर्यवसान बिरप्पाने मंदिराच्या कट्ट्यावर मद्देप्पाची हत्या करण्यामध्ये झाले. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.