बेळगाव लाईव्ह : गेल्या दहा दिवसांपासून घरोघरी, गल्लोगल्ली विराजमान झालेल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांची लगबग सुरु झाली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले असून ठिकठिकाणी विसर्जनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कपिलेश्वर तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून याठिकाणी आकर्षक रोषणाई यासह सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीला बेळगावसह परगावातील हजारो गणेशभक्त भक्त गर्दी करतात. यासाठी प्रशासनाकडूनही योग्य ती तयारी केली जात आहे. शहरात 350 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. शिवाय मंडळांकडून हलते देखावे आणि आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची उंची अधिक आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडचणी येऊ नयेत यासाठी विसर्जन मार्गातील अडथळा ठरणारी झाडे आणि एका बाजूला झुकलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.
पुणे – मुंबई नंतर भव्य पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या बेळगावच्या विसर्जन मिरवणुकीसाठी श्री गणेशमूर्ती विसर्जन आणि मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेदेखील आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विसर्जन मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या आहेत. मंगळवारी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यासाठी बेळगाव सर्वच विसर्जन तलावांवर बॅरिकेड तसेच निर्माल्य कुंड, प्रकाश योजना बसविण्यात आली आहे. नागरिकांची एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी कपिलेश्वर मंदिर परिसरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
दोन वर्षांपूर्वी धर्मवीर संभाजी चौकात गॅलरी उभारण्यात आली नव्हती. यामुळे बेळगावच्या गणेशभक्तांना जागा मिळेल तेथे उभे राहून विसर्जन मिरवणूक पहावी लागली. त्यामुळे गणेशभक्तांमधून नाराजीही व्यक्त करण्यात आली. यावर्षी मात्र दोन दिवस आधीच धर्मवीर संभाजी चौकात गॅलरी तसेच स्टेज उभारण्यात आले असून बेळगावसह आसपासच्या परिसरातून आलेल्या भाविकांना गॅलरीमधून गणेशमूर्ती तसेच मिरवणूक पाहता येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सोमवारी सायंकाळपासूनच लिलाव आणि इतर सर्व विधी आटोपून घेण्याची लगबग सुरु होती. सोमवारी दिवसभरात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक, कमी – अधिक प्रमाणात सरी बरसल्या असून विसर्जन मिरवणुकीवरही पावसाचे सावट राहण्याची शक्यता असल्याने वेळेत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करून वेळेत मिरवणूक आटोपती घेण्यासाठी प्रशासन, पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.