बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसरात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून बाजारपेठ देखील सज्ज झाली आहे. कांही सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी आगमनही झाले असून एकंदर शहर परिसरात सर्वत्र भक्तीपूर्ण गणेशमय वातावरण निर्माण झाले आहे.
श्री गणेश चतुर्थीने उद्या शनिवारपासून बेळगाव शहरातील पारंपारिक श्री गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून नेहमीप्रमाणे हा उत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी सध्या बेळगावकरांची लगबग पहावयास मिळत आहे. सध्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून बाजारपेठेत फळफुलां सोबतच पूजेच्या साहित्य खरेदीलाही वेग आला आहे.
त्यामुळे बाजारपेठेत फळ फुलांबरोबर पूजेच्या साहित्याची मागणी वाढली आहे. विशेषत: फुले, नारळ आणि पाच फळांना मागणी असल्यामुळे केळी सफरचंद संत्री, पेरू, चिकू, मोसंबी या फळफळावळांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पाच फळे एकत्रित विक्री केली जात असून 100 पासून 250 रुपयांपर्यंत त्यांचा दर आहे. पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, रविवार पेठ आदी ठिकांणी फळांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.
फळ आणि फुलांसोबतच कापूर, अगरबत्ती, धूप, लाकडी पाट, रुमाल, आरतीचे ताम्हण, हळदीकुंकू, अबीर गुलाल, रांगोळी, विड्याची पाने, सुपारी, दुर्वा, हार, समई, निरांजन आदी पूजेच्या साहित्याची विक्रीही तेजीत असल्याचे पहावयास मिळत आहे. श्री गणेशोत्सव निमित्त शहरातील विविध ठिकाणच्या मॉलमध्ये देखील पूजा साहित्यासह नारळ, केळी, सफरचंद, डाळिंब, पेरू वगैरे फळे माफक दरात खास उपलब्ध करण्यात आली आहेत.
अलीकडे कांही वर्षांपासून बेळगाव शहर परिसरात गणेश चतुर्थीच्या आधीच श्रीमुर्तीच्या आगमन सोहळ्याची प्रथा वाढीस लागली आहे. ग्रामीण भागातही त्याचे अनुकरण केले जात आहे. त्याच अनुषंगाने बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली, खडक गल्ली, कोनवाळ गल्ली, जुने बेळगाव कचेरी गल्ली वडगाव शहापूर अशा शहर उपनगरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी जल्लोषी स्वागत सोहळ्याच्या माध्यमातून श्री गणेश चतुर्थी पूर्वीच आपापल्या श्रीमूर्ती आणून ठेवल्या आहेत.
शहरात गेल्या तीन-चार दिवसात सार्वजनिक मंडळातर्फे बाप्पाच्या मूर्तीचे आगमन सोहळे पारंपारिक वाद्यांसह झांज पथक, भजनी मंडळ, फटाक्यांची आतशबाजी, ढोल -ताशा वाद्यांच्या गजरात मोठ्या जल्लोषी वातावरणात पार पडले आहेत. या पद्धतीने भव्य आगमन सोहळ्याच्या माध्यमातून आणलेल्या श्री गणेश मूर्तींचे आता उद्या शनिवारी श्री गणेश चतुर्थी दिवशी विधिवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
एकंदर सध्या बेळगाव शहरात गणेशमय वातावरण निर्माण झाले असून खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे. बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव शांततेने सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.