बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे श्री गणेशोत्सवानिमित्त अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गोपाळ गुंजटकर यांच्या पुढाकाराने फिरत्या निर्माल्य कुंड उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे.
श्री गणेशोत्सव काळात घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिची भक्तीभावाने पूजाअर्चा केली जाते. मात्र श्री गणेशाला वाहिलेली फुले, पुष्पहार, दूर्वा, गेजवस्त्र वगैरे निर्माल्य पाण्यात विसर्जित करण्याऐवजी रस्त्याकडेला झाडाखाली वगैरे सार्वजनिक ठिकाणी टाकण्याचा प्रकार केला जातो.
हे निदर्शनास येताच माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी 8 वर्षांपूर्वी स्वखर्चाने अनगोळ परिसरात फिरते निर्माल्य कुंड उपक्रम सुरू करण्याद्वारे गणेश भक्तांच्या दारापर्यंत जाऊन निर्माल्य गोळा करण्याचे स्तुत्य कार्य सुरू केले आहे.
यंदा देखील हा उपक्रम राबविण्यात येत असून धर्मवीर संभाजी महाराज चौक अनगोळ येथे सदर उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी माजी नगरसेवक विनायक गोपाळ गुंजटकर,
राजू पवार, भाऊ कावळे, गजानन चौगुले, सचिन चिरमिटे, विनय राजगोळकर, विश्वनाथ पवार, बाळू पवार, अजित पाटील, पांडू पाटील, विनायक कंग्राळकर, दीपक साळुंखे, विशाल, भर्मा कंग्राळकर, ओंकार चौगुले, मारुती तलवार स्वामी चरतीमठ, रोहन परमोजी आदी उपस्थित होते.