बेळगाव लाईव्ह:पिरनवाडी येथील स्मशानभूमीमध्ये दिवे नसल्यामुळे गेल्या 30 जुलैरोजी मोबाईल लाईटच्या प्रकाशात एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली होती. याची गांभीर्याने दखल घेत पिरनवाडी पट्टणपंचायतीच्या सीईओंनी स्मशानभूमीत तात्काळ वीजपुरवठ्याची सोय केल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, पिरनवाडी गावातील जाधव यांचे गेल्या 30 जुलै रोजी निधन झाले. त्यांना रात्री अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये नेण्यात आले. त्यावेळी वीज पुरवठ्या अभावी बंद असलेल्या दिव्यांमुळे स्मशानात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. परिणामी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाईल वरील लाईटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार उरकावे लागले.
यासंदर्भात गावातील नाराज नागरिकांनी दुसऱ्या दिवशी पिरनवाडी पट्टण पंचायतीचे नव्याने अधिकारपदाची सूत्रे हाती घेतलेले सीईओ रवींद्र गडादी यांची भेट घेतली. तसेच त्यांना स्मशानभूमीमध्ये रात्री अंधारात कशाप्रकारे मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागले त्याचे फोटो दाखवून तक्रार केली.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत सीईओ गडादी यांनी पिरनवाडी स्मशानभूमीत तात्काळ वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अवघ्या 24 तासात संपूर्ण वायरिंग बदलून स्मशानभूमीमध्ये प्रखर दिव्यांची सोय करण्यात आली. पिरनवाडी पट्टण पंचायतीचे यापूर्वीच्या एकाही सीईओंनी इतक्या तत्परतेने आपले एकही कर्तव्य पार पाडले नव्हते किंवा नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती.
तथापि नवे सीईओ रवींद्र गडादी यांनी तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडत स्मशानभूमीत दिव्यांची सोय केल्याबद्दल गावातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
अनिल भोईटे, सचिन गोरले सचिन राऊत जोतिबा लोहार शिवाजी शहापूरकर नारायण मुचंडीकर सर्व कामे करून घेण्यासाठी यांनी प्रयत्न केले.