Thursday, January 9, 2025

/

विश्वगुरू’च्या दिशेने जाणाऱ्या देशात विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी होतोय जीवघेणा प्रवास!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सातासमुद्रापार भारताच्या प्रगतीचा डंका वाजविण्यासाठी एकीकडे राजकारणी आटापिटा करत आहेत.. विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आणि स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी वर्षे पार करणाऱ्या भारतात आजही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चक्क टायर ट्यूब ची बोट बनवून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.. हि बाब स्वतंत्र आणि प्रगतिशील भारताच्या व्याख्येचा विरोधाभास निर्माण करणारी आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या तालुक्यातील निंगापूर या गावातील विद्यार्थ्यांची हि व्यथा नेहमीचीच झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून तलावाच्या बॅकवॉटर मधून येथील रहिवाशांना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात या भागातील नद्यांना येणाऱ्या पुरामुळे, या भागात असलेले जलाशय तसेच हुलीकेरे या तलावाच्या बॅकवॉटरमुळे येथील नागरिकांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटतो.

या भागात पूल बांधणी करण्यात यावी या मागणीसाठी वर्षानुवर्षे नागरिक निवेदने, आवाहने, मागण्यांचा पाऊस पाडत आहेत. मात्र पावसाळ्यात पडणाऱ्या अतिवृष्टीने मागण्यांचा पाऊस मात्र कोरडाच राहिला आहे….! परिणामी या भागातील नागरिकांना तलावाच्या बॅकवॉटरमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असून या समस्येकडे आजवर ना अधिकारी ना लोकप्रतिनिधी आणि ना ही प्रशासनाने गांभीर्याने पाहिले.

या भागातून शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या पाण्यातून टायर ट्यूबच्या माध्यमातून पल्ला गाठून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आपल्याला शिक्षण घेता यावे यासाठी प्रशासनाने आपल्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे अशी मागणी चिमुरड्या विद्यार्थ्यांनी केली असून या भागातील या समस्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात वायरल झाला.Student

यानंतर जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी तातडीने याची गांभीर्याने दखल घेत उद्याच या भागात बोटीची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या भागाचे आमदार आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. लागलीच या भागाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनीही या भागात लवकरात लवकर बोटीची व्यवस्था तसेच पूलबांधणीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आज प्रतिसाद देण्यात आला असून याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला तातडीचा निर्णय कौतुकास्पदच आहे. मात्र शिक्षण घेण्यासाठी आजही चिमुरड्या विद्यार्थ्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय हि बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

आठवडाभरावर देश स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. मात्र या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आणि वास्तवातील स्वातंत्र्य खरोखरच ताळमेळ करणारे आहे का? यालाच स्वातंत्र्य म्हणावे का? हा प्रश्न मात्र अंतर्मुख करणारा आहे…..!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.