बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सांबरा विमानतळाच्या श्रेणीत सुधारणा करून सांबरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून श्रेणीसुधारित करण्यासाठी ‘डिमांड सर्व्हे’ करणे आवश्यक असल्याचे बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सुचविले आहे.
आज विमानतळ अधिकाऱ्यांसमवेत खासदार जगदीश शेट्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी उपरोक्त मुद्दा सुचविला आहे. या बैठकीत बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून श्रेणीसुधारित करण्यासाठी ‘डिमांड सर्व्हे’ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले आहे.
बेळगाव हे सर्वात वेगवान वाढणारे शहर असून बेंगळुरूनंतर राज्याची हि दुसरी राजधानी मानली जाते. हवाई सेवेच्या बाबतीत बेळगावचे विमानतळ बेंगळुरू आणि मंगलोर विमानतळांनंतर राज्यातील तिसरे मोठे विमानतळ बनले आहे, येथून आधीच देशातील विविध शहरांशी 10 उड्डाणे यशस्वीपणे जोडली गेली आहेत.
बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून श्रेणीसुधारित करण्यासाठी सर्व पात्रता आहेत. तसेच या संदर्भात जनतेच्याही मागण्या वाढल्या असून ‘डिमांड सर्वेक्षण’ आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले.
या बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव शहर (उत्तर)चे आमदारआसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक उपस्थित होते.