बेळगाव लाईव्ह :बांगलादेशातील विविध कार्यक्रमांचा अभ्यास करण्यासाठी गेलेला बेळगावच्या 25 विद्यार्थ्यांचा गट तेथील देशव्यापी दंगलींमुळे तसेच दळणवळणाच्या पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्यामुळे सुरक्षितपणे घरी परतला आहे. भारतीय दूतावासाने या विद्यार्थ्यांच्या परतीची सोय केली होती.
बांगलादेशात तणाव वाढल्याने संबंधित पालकांनी आपल्या मुलांसाठी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि जिल्हा प्रशासनाकडे चिंता व्यक्त करून मदत मागितली होती.
त्याची तात्काळ दखल घेत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केंद्राला अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुरवली, ज्यामुळे ते सर्व विद्यार्थी बेळगावला सुरक्षित परतले आहेत.
परत आलेल्यांपैकी एका वैद्यकीय विद्यार्थ्याने तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन करताना “सुमारे एक आठवड्यापूर्वी दंगलखोरांनी मोबाइल टॉवर उद्ध्वस्त केल्यामुळे आम्हाला बाहेर न पडता आमच्या कॉलेजच्या वसतिगृहातच राहण्यास सांगण्यात आले होते. परिस्थिती आणखी बिघडली आणि आम्हाला जाणवले की घरी परतण्याची वेळ आली आहे.
त्यानुसार आम्ही 4 ऑगस्टला बेळगावला पोहोचलो” असे सांगून “जर आम्ही जास्त वेळ थांबलो असतो तर परतणे खूप कठीण झाले असते”, असे स्पष्ट केले. अन्य एका विद्यार्थ्याने “तेथून बाहेर पडणे हा एक दिलासा होता. परिस्थिती भयंकर आणि असुरक्षित होती, प्रत्येकजण मानसिकरित्या थकलेला होता”, असे सांगितले.