Thursday, November 28, 2024

/

‘या’ गल्लीत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; तात्काळ बंदोबस्ताची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील काँग्रेस रोड क्र. 2 या काँग्रेस विहिरी (वीरसौध) समोरील गल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून महापालिकेने त्यांचा तात्काळ बंदोबस्त तर करावाच शिवाय या कुत्र्यांचे पोषण करणाऱ्या गल्लीतील दोन महिलांना चांगली समज द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांसह दुचाकी वाहन चालकांकडून केली जात आहे.

टिळकवाडी येथील काँग्रेस विहिरी समोरील काँग्रेस रोड क्र. 2 या गल्लीमध्ये अलीकडे भटक्या कुत्र्यांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे. या ठिकाणी जवळपास 25 भटकी कुत्री असून त्यापैकी कांही कुत्री अपार्टमेंटच्या आवारात ठाण मांडून असतात तर इतर कुत्री कळपाने रस्त्यावर फिरत असतात. तसेच मुख्य काँग्रेस रोडवर मोर माॅल समोर 7-8 कुत्री बसलेली असतात. या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री असण्यास सदर गल्लीतील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोन महिला कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

या महिला रोजच्या रोज शिळे अन्न, खाद्यपदार्थ वगैरे खायला घालून भटक्या कुत्र्यांसाठी जणू अन्नछत्रच चालवत असल्याचे समजते. यापैकी ज्योतिर्लिंग अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेने तर कुत्र्यांना खायला घालण्यासाठी जवळपास 20 लहान बुट्ट्या ठेवल्या असून त्यातून ती त्या कुत्र्यांना दिवसातून दोन-तीन वेळा खायला घालत असते, अशी माहिती एका स्थानिकाने बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आमच्या अपार्टमेंटमध्ये एक मुलगी आहे ती देखील या भटक्या कुत्र्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करत असते. त्यामुळे कांही कुत्री अपार्टमेंटच्या आवारातच झोपून मुक्काम ठोकून असतात. सदर दोन्ही महिना आपल्या अपार्टमेंटच्यासमोर किंवा मुख्य काँग्रेस रोडच्या पलीकडच्या फूटपाथवर कुत्र्यांना खायला घालत असतात. फार दिवसापासून हा प्रकार सुरू असून ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी आक्रमक होऊन रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांच्या अंगावर धावून जात असतात. त्यामुळे दुचाकीला अपघात होणे कुत्र्याने चावा अशा घटना येथे सारख्या घडत असतात.

दुचाकीवर पिशवी वगैरे काही वेगळे सामान दिसले किंवा वेगाने दुचाकी चालवली की ही कुत्री दुचाकीच्या मागे लागतात. यासंदर्भात गल्लीतील रहिवाशांनी संबंधित दोन महिलांना कुत्र्यांना असे गल्लीत खायला घालू नका. तुम्हाला प्राणी दया असेल तर दूर कुठे कुठेतरी त्यांना खायला घालत चला असे अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्या कोणाला जुमानत नसल्यामुळे सर्वजण हातबल झाले आहेत. गल्लीतील सर्वांनाच या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे.Tilakwadi area

सदर कुत्री अचानक अंगावर धावून येत असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना जीव मोठी धरून जावे लागत आहे. कांही दिवसांपूर्वी या गल्लीतील कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्यामुळे शुभम अशोक कडोलकर या युवकावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वेळ आली आहे. शुभम आणि त्याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक अशोक कडोलकर गेल्या 7 जुलै रोजी दुचाकीवरून मंडोळी रोड, कैवल्य योग मंदिराजवळील आपल्या घरी निघाले होते. त्यावेळी उपरोक्त गल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या अंगावर धावून जात शुभम कडोलकर यांच्या पायाचा चावा घेतला.

तरी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काँग्रेस रोड गल्लीतील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. तसेच त्या कुत्र्यांचे पोषण करणाऱ्या गल्लीतील संबंधित दोन महिलांना चांगली समज द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशी आणि दुचाकी चालकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.