बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील छत्र. शिवाजी नगर येथील दुसरी आणि तिसरी गल्ली येथे ड्रेनेजच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून या भागात असणारे हॉटेल, लॉज, स्वीटमार्ट यांच्यातील कचरा ड्रेनेज लाईनमध्ये टाकल्याने हि समस्या उद्भवत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून हि समस्या जैसे थे असून हि समस्या सोडविण्यासाठी आजवर अनेकवेळा प्रशासन, पालिका प्रशासन, अधिकारी, लोकप्रतिनिधींना निवेदने सादर करण्यात आली आहेत.
अनेकवेळा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. मात्र हि समस्या सोडविण्यासाठी आजवर कुणीही पुढाकार घेतला नाही. ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत येत थेट घरात शिरत आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असून रोगराई बळावत आहे.
यासंदर्भात अनेकवेळा निवेदने देऊनही जाणीवपूर्वक या भागाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली असून ड्रेनेज तुंबल्याने या प्रभागात अनेक समस्या देखील उद्भवत आहेत.
डेंग्यू – मलेरियासारख्या आजारांनी उच्छाद मांडला असताना या समस्येकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.
या भागात अनेक हॉटेल, खानावळी, स्वीटमार्ट, लॉज असून हे व्यावसायिक ड्रेनेज पाईपमध्ये कचरा टाकत आहेत. हि समस्या सातत्याने उद्भवत असून या सर्व व्यावसायिकांसाठी दुसऱ्या बाजूने ड्रेनेज लाईनची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
मात्र अद्याप सदर व्यावसायिकांनी याचा वापर करणे सुरु केले नाही. या व्यावसायांचे सर्व सांडपाणी दुसऱ्या ड्रेनेज लाईनला जोडण्यात न आल्याने येथील रहिवाशांना याचा फटका बसत आहे. येत्या ४ ते ५ दिवसात हि समस्या सोडविण्यासाठी कोणतीही कार्यवाही न झाल्यास पेट्रोल पंपसमोर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा येथील स्थानिकांनी केला आहे.