Sunday, November 17, 2024

/

सेवानिवृत्त जवानाची ‘अशी ही’ धाडसी जनसेवेची पुनरावृत्ती

 belgaum

बेळगाव लाईव्ह :समाजात बोटावर मोजण्याइतके लोक असे असतात की जे एखादे धाडस करून इतरांचे कल्याण करण्यात आनंद मानतात. त्यापैकीच नानावाडी येथील सेवानिवृत्त जवान अशोक कोरवी हे एक आहेत. परवा मुसळधार पावसात तुडुंब भरून वाहणाऱ्या नाल्यात उतरण्याचे धाडस करणाऱ्या कोरवी यांनी आज त्याची पुनरावृत्ती करताना पावसामुळे प्रवाहित नानावाडी नाल्यात उतरून त्याची स्वच्छता केली.

काँग्रेस रोड वरून मेजर रामस्वामी अव्हेन्यू रोड वरून नानावाडीच्या दिशेने जाताना मधे लागणाऱ्या श्री लक्ष्मी मंदिराच्या चौका लगतचा नाला सीडीवर्कच्या ठिकाणी झाडाच्या फांद्या आणि केरकचरा अडकून तुंबला होता. ही बाब नानावाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त जवान अशोक कोरवी यांच्या निदर्शनास आली.

त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे महापालिकेकडे तक्रार करून कारवाई केंव्हा होणार याची वाट पहात न बसता कोरवी यांनी अंगातील कपडे काढून स्वतः पावसाच्या पाण्याने प्रवाहित झालेल्या नाल्यात उतरून स्वच्छतेचे काम हाती घेतले. नाल्यात पाण्याचा प्रवाह जोरदार असतानाही न डगमगता नाल्यात त्यांनी सीडीवर्कच्या आत शिरून पाणी निचऱ्यास अडथळा ठरणारी नारळाच्या झाडाची फांदी, केरकचरा वगैरे काढण्याद्वारे नाल्याचे पात्र स्वच्छ केले.

गेल्या पंधरा-वीस दिवसात पडलेल्या मुसळधार पावसावेळी देखील सामाजिक कार्यकर्ते अशोक कोरवी यांनी आज केलेल्या धाडसापेक्षाही मोठे धाडस केले होते. मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून धोकादायक स्वरूपात वाहणाऱ्या नानावाडीच्या या नाल्यात ते प्रवाह विरुद्ध उतरले होते. पूर आलेल्या नाल्यामुळे विपरीत परिस्थिती उद्भवू नये, परिसरातील लोकांना त्रास होऊ नये, हा कोरवी यांच्या या धाडसाचा मुख्य निस्वार्थ हेतू होता.

त्यावेळी जीवावर उदार होऊन कोरवी यांनी नाल्यातील पाण्याच्या प्रवाह अडवणारे अडथळे दूर केले होते. त्यानंतर आज जनहितार्थ पुन्हा एकदा अशोक कोरवी यांनी नाल्यात उतरून स्वच्छता केल्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक आणि प्रशंसा होत आहे.Nanawadi

दरम्यान, नानावाडी येथून वाहत येणारा सदर नाल्याच्या सीडीवर्कच्या ठिकाणी सांडपाणी तुंबण्याची समस्या वारंवार उद्भवत असते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे तर ही समस्या अधिकच गंभीर होते. पावसाळ्यात तुंबून तुडुंब भरलेल्या नाल्याचे पाणी पात्र बाहेर पडून आसपासचा परिसर जलमय होत असतो.

एवढेच नव्हे तर एखाद्या नदीच्या बॅक वॉटर प्रमाणे नाल्याचे पाणी मागे सारले जाऊन मोठ्या प्रमाणात नानावाडीतील सखल भागात शिरत असते. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी संबंधित सीडी असलेल्या ठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी तुंबणाच्या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.