बेळगाव लाईव्ह : सध्या सोशल मीडिया माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. वायरल व्हिडीओजचा सुळसुळाट सुरु असून आता चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणाऱ्यांना मात्र सावधानता बाळगावी लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणे, अफवा पसरवून लोकांमध्ये दहशत माजविणे किंवा दिशाभूल करणे या कारणास्तव पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणारच आहे शिवाय कारागृहाची हवा देखील मिळणार आहे.
बेळगावमध्ये एका व्हायरल व्हिडिओमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून बेळगावमध्ये वाघाच्या व्हिडिओने लोकांची झोप उडवली होती. बेळगाव तालुक्यातील यरमाळ आणि कोंडुसकोप्प मध्ये वाघाचा आणि बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडीओ बनवून वायरल करण्यात आला होता.
अनेक तरुणांच्या सोशल मीडियावरील स्टेटसवर वाघाचा खरा व्हिडिओ पाहून अधिकारीही चक्रावून गेले. मात्र या प्रकारचा वेगवान तपास घेत अखेर हा व्हिडीओ फेक असल्याचे निदर्शनात आले. आणि याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मल्लेश देसाई आणि शीतल नामक व्यक्तीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
एकीकडे भीमगड अभयारण्य आणि कित्तूर राणी प्राणीसंग्रहालय.यामुळे गेल्या काही दिवसांपासून आसपास परिसरात वाघाचा वावर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याचदरम्यान वाघाचा वावर असणारा व्हिडीओ वायरल झाला.
वाघाचा व्हिडीओ पाहून बेळगाव वनविभागाचे अधिकारी आणि बेळगाव पोलिसांची झोप उडाली. विशेषत: बेळगाव तालुक्यातील यरमाळ आणि कोंडुसकोप्प गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनि सावधगिरी बाळगली. जंगली मांजर दिसल्यावर काही लोकांनी तो वाघच असल्याची अफवा पसरविली. तीन दिवस शोध घेऊनही वाघाच्या पायाचे ठसे कुठेही सापडले नाहीत. वाघाचा व्हिडीओ कुठून आला, असे विचारले असता सर्वांनी शीतल आणि मल्लेशकडे बोट दाखवले. हा व्हिडीओ एडिट केल्याचे स्पष्ट होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. यानंतर पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे दोघांना सोपविण्यात आले आहे.
यामुळे घडल्या प्रकारानंतर आता प्रत्येकाने अशापद्धतीने चुकीच्या पोस्ट वायरल केल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते हे लक्षात घेऊन कोणत्याही पोस्ट वायरल करण्यापूर्वी विचार जरूर करावा.