Thursday, December 19, 2024

/

बेळगावात पुन्हा पावसाची हजेरी…

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मागील महिन्यात धुव्वाधार बरसलेल्या पावसाने गेल्या पंधरवड्यात थोडी विश्रांती घेतली होती. पावसाच्या श्रावणसरी वगळता मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्याने २०१९ ची पुनरावृत्ती टळली. मात्र गेल्या २४ तासात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून बेळगाव शहर, परिसर आणि तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. शनिवारी पहाटे ४.३० च्या सुमारास मध्यम सरीने सुरु झालेल्या पावसाने सकाळी ६.३० च्या दरम्यान जोर धरला. दुपारनंतर सायंकाळी ५.३० पर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. आज दिवसभरात ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानामुळे अनेकजण सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांनी त्रस्त झाले असून थंडीबरोबरच पावसाचाही सामना करावा लागत असल्याने डॉक्टरांकडेही गर्दी पाहायला मिळत आहे.

मध्य बांगलादेश व लगतच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर बांगलादेशात सक्रिय झाल्याने कर्नाटक किनारपट्टीवरील पूर्व मध्य अरबी समुद्रापासून मालदीव भागापर्यंत असलेला कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली असून आग्नेय अरबी समुद्र ते गुजरातपर्यंत हवेच्या वरच्या भागावर चक्रीय स्थिती असून, त्याचा प्रभाव वाढलेला आहे. यामुळे वादळी वारे, विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी बरसत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अचानक येत असलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडत आहे. रस्त्यावर विविध प्रकारचे स्टॉल्स विक्रेत्यांनी मांडले असून अचानक येणाऱ्या पावसाच्या मोठ्या सरींमुळे या व्यापाऱ्यांचे देखील हाल होत आहेत.

शेतीकामासाठी अद्याप पावसाची गरज असून या पावसामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. २७ ऑगस्टपर्यंत विविध ठिकाणी पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.