बेळगाव लाईव्ह : हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिरात अकॅडमी ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनचा शताब्दी महोत्सव नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांच्याहस्ते गुरुदेव गोविंद रानडे यांच्या तत्वांवर आधारित ‘फूटप्रिंट ऑन द सॅन्ड्स ऑफ टाईम्स’ आणि ‘नित्य नियरावली’ या दोन कन्नड पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना मोहन भागवत यांनी सुखाची संकल्पना कशी असावी याबाबत विचार मांडले. माणूस आज पैसे कमविण्यासाठी १८ तासांहून अधिक काळ घराबाहेर राहतो. ज्या घरासाठी, कुटुंबासाठी तो कमावतो त्या कुटुंबासोबत किती वेळ राहतो? कुटुंबाला किती वेळ देतो? हे पडताळून पाहणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे.
सुख हे शाश्वत नाही. दुःखात आपण संयम राखला पाहिजे. कठोर परिश्रमानेच आनंद मिळतो. आज कमावलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खर्ची जाणार आहे. आजार, आपत्ती यासारख्या गोष्टीत कधी तरी हा पैसा खर्ची जाणार असून आजचा दिवस सुखाने, आनंदाने जागा असा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमास पदमभूषण कमलेश पटेल, एम. बी. जिरली, अशोक पोतदार आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.