बेळगाव लाईव्ह:कोल्हापूर येथे गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळ कडे जात असताना कार – गुड्स वाहन अमोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील बेळकुड क्रॉसवर घडली आहे.
सौरभ संजू कुलकर्णी वय 22 व राकेश सुरेंद्र वाडकर वय 23 दोघे राहणार मुधोळ असे अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत.
या घटने बाबत समजलेली अधिक माहिती अशी की मुधोळ येथील चार जण युवक कारने गणेश मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूर येथे गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन मुधोळकडे परत जात असताना रात्रीच्या वेळी चिकोडी तालुक्यातील बेळकुड क्रॉस नजीक निपाणी महालिंगपूर राज्य महामार्गावर समोरून येणाऱ्या गुड्स वाहनाची जोराची धडक बसली. सदर गुड्स वाहन चिकोडी शहरातील सुभाष बजंत्री यांचे असून ते कबूल होऊन चिकोडी कडे परत येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील वरील दोन युवक ठार झाले आहेत.
तर कार मधील आनंद घाटगे विकास बेळगी व गुड्स वाहनातील सुभाष बजंत्री, त्याची पत्नी रेणुका बजंत्री दोघे राहणार चिकोडी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
मयत तरुणांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याप्रकरणी चिकोडी रहदारी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.