बेळगाव लाईव्ह : गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी नवीन रेशनकार्डबरोबर रेशनकार्ड दुरुस्ती वाढली आहे. दिलेल्या मुदतीत रेशनकार्ड दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने पुन्हा दहा दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. रेशनकार्ड दुरुस्तीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता या मुदतीत 10 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे देऊन बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांवर आता खात्यातर्फे कारवाई होणार आहे. आयकर विभाग, रेल्वे, चारचाकी असलेले आणि धनाढ्यांची बीपीएल कार्डे रद्द होणार आहेत.
नावात बदल, नवीन नाव जोडणे, पत्ता बदल आणि इतर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. संबंधितांनी 10 ऑगस्टपर्यंत रेशनकार्डची दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहनही अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे. मागील कित्येक महिन्यांपासून नवीन रेशनकार्ड आणि त्यामधील दुरुस्तीचे काम प्रलंबित पडले होते. त्यामुळे अनेकांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत होते. सद्य परिस्थितीत रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे रेशनकार्ड दुरुस्तीसाठीही नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.
गॅरंटी योजनेमुळे रेशनकार्डची मागणी वाढली असली तरी नवीन रेशनकार्ड वितरणाचे काम ठप्प आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. मागील दोन वर्षांत नवीन रेशनकार्ड वितरणाची प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेकांना रेशनकार्डपासून दूर रहावे लागले आहे. नवीन रेशनकार्डसाठी लाभार्थी प्रतीक्षेत असले तरी शासनाकडून याबाबत कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे नवीन रेशनकार्ड वितरणाची प्रक्रिया कधी सुरू होणार या विवंचनेत लाभार्थी आहेत.