बेळगाव लाईव्ह :देशाच्या स्वातंत्र्यासाठी गेल्या 1942 मध्ये आजच्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी ब्रिटिशांच्या विरोधात ‘भारत छोडो’ आंदोलन छेडण्यात आले होते. त्याचे औचित्य साधून शहरातील विविध संघटनांतर्फे आज शुक्रवारी सकाळी ‘कार्पोरेट कंपन्या देश छोडो’ आंदोलन छेडण्यात आले.
शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे सदर आंदोलन छेडून जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कार्पोरेट कंपन्यांच्या पाठीशी उभे न राहता स्थानिक उद्योग व्यवसायांच्या पाठीशी उभे राहावे, अशा मागणीचे केंद्र सरकारच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदन सादर करण्यापूर्वी चन्नम्मा सर्कल येथे कॉर्पोरेट कंपन्यांना प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. आजच्या या संयुक्त आंदोलनात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक आणि महिला संघटनांचा सहभाग होता.
याप्रसंगी बोलताना महिला नेत्या म्हणाल्या की, महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली केल्या 1942 मध्ये या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलन छेडण्यात आले होते. आपल्या देशातून ब्रिटिशांना हद्दपार करण्यासाठी हे देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले होते.
ब्रिटिशांकडून देशातील जनतेवर जी जुलूम, जबरदस्ती केली जात होती, जनतेची जी पिळवणूक होत होती ती थांबवण्यासाठी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू वगैरे तत्कालीन बड्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रक्रियेचा पाया घातला होता. त्यामुळेच ‘भारत छोडो’ आंदोलन आपल्या देशासाठी महत्त्वपूर्ण आहे.
आजच्या घडीला केंद्र सरकार कार्पोरेट जगताशी हात मिळवणी करून स्थानिक उद्योग व्यवसाय उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. षडयंत्राला आळा घातला गेला पाहिजे. केंद्र सरकारने अंबानी, अंदानी यांच्यासारख्या उद्योग समूहांच्या पाठीशी उभे न राहता स्थानिक उद्योग व्यवसायांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या उत्कर्षाला प्राधान्य द्यावे अशी आमची मागणी आहे. यासाठीच आम्ही आज कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिकृतीचे दहन करण्याद्वारे ‘कार्पोरेट कंपन्या देश छोडो’ छेडले आहे. येत्या काळात स्थानिक उद्योग व्यवसायांना प्राधान्य दिले गेले पाहिजे युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्या महिला नेत्याने स्पष्ट केले.