बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील पोस्टमन सर्कल, अंबा भुवन जवळील नाला केरकचरा, खराब अन्न भरलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य टाकाऊ वस्तूंमुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणात तुंबला असून त्याची युद्धपातळीवर स्वच्छता करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव स्टेशन रोडवरील पोस्टमन सर्कल, अंबा भुवन जवळील नाल्याची वेळच्यावेळी स्वच्छता करण्याकडे महापालिकेचे कायम दुर्लक्ष होत असते. त्यामुळे पोस्टमन सर्कल जवळील शिवाजी रोड शेजारील या नाल्याचा कांही मीटर अंतराचा भाग म्हणजे कचरा डेपोच झाला आहे. सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात या नाल्यात वाहते पाणी न दिसता प्रचंड प्रमाणात साचलेला केरकचरा पहावयास मिळत आहे.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारी व नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी दरवर्षी केली जाते. मात्र दरवेळी या मागणीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. प्रत्यक्षात गटार व नाले स्वच्छतेची मोहीम व्यवस्थित राबविण्याऐवजी वरवरची स्वच्छता करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जातो.
पोस्टमन सर्कल जवळील नाल्याच्या बाबतीतही यापूर्वी बऱ्याचदा असे घडले आहे. या नाल्याची साफसफाई वेळच्यावेळी व्यवस्थितपणे केली जात नसल्यामुळे शिवाजी रोड शेजारील नाला वरचेवर केरकचऱ्याने तुंबलेला असतो.
सध्या देखील हा नाला कचऱ्याने तुंबला असून त्यामुळे दुर्गंधी पसरून वातावरण दूषित होत आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधी आणि मनपा आयुक्तांनी आता किमान पावसाळ्यात तरी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन या नाल्याची ताबडतोब स्वच्छता करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक, दुकानदार आणि व्यावसायिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, सदर नाल्यात केरकचरा तुंबण्यास महापालिके इतकेच या परिसरातील नागरिक देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप आहे. घरगुती कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने कचरा गाड्यांची सोय केली आहे तथापि या कचरा गाड्यांकडे आपल्या घरातील कचरा देण्याऐवजी बरेच लोक ये-जा करण्याच्या वाटेवर असलेल्या पोस्टमन सर्कल नजीकच्या नाल्यात केरकचरा, खराब अन्न भरलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य टाकाऊ वस्तूं टाकण्यामध्ये धन्यता मानतात.
महापालिकेने वेळच्या वेळी नाला स्वच्छ करणे जसे गरजेचे आहे तसे नाल्यात कचरा टाकण्याचा हा प्रकार देखील बंद होणे अत्यंत गरजेचे आहे, असे स्थानिक नगरसेवक आणि जाणकारांचे मत आहे.