बेळगाव लाईव्ह : ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणारा श्री गणेशोत्सव आणि १६ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्था उत्तमप्रकारे राखली जावी अशी सूचना एडीजीपी आर. हितेंद्र यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली.
आज श्री गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी आर. हितेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना एडीजीपी आर. हितेंद्र यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सणासुदीच्या काळात दरवर्षीप्रमाणे यंदाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, उत्सव काळात पाळण्यात येणारे नियम, तांत्रिक उपाययोजना आखण्यात याव्यात, यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सणासुदीच्या काळात जनतेने देखील जातीय सलोखा राखून, आगामी सण आणि उत्सव आनंदात आणि उत्साहात पार पाडावेत, उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन एडीजीपी आर. हितेंद्र यांनी केले.
या बैठकीला पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग, आयजीपी विकास कुमार, एसपी भीमा शंकर गुळेद, डीसीपी रोहन जगदीश तसेच मार्केट, खडेबाजार, एपीएमसी पोलिस स्थानक आणि विविध पोलीस स्थानकातील पीएसआय आणि निरीक्षक उपस्थित होते.