बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मिरवणूक मार्गाची अत्यंत चुकीच्या पद्धतीने डागडुजी केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत लोकमान्य टिळक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काल रविवारी रात्री पाहणी दौरा करून कंत्राटदाराला जाब विचारला.
शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केलेल्या मागणीनुसार महापालिकेकडून शहरातील खड्डे पडून खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी केली जात आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे बुजवून केल्या जाणाऱ्या पॅचवर्कच्या कामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काँक्रीट वापरले जात असल्याने संबंधित भागातील कार्यकर्ते व गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी संताप व्यक्त होत आहे.
याची दखल घेत लोकमान्य टिळक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, सुनील जाधव, रवी कलघटगी, नितीन जाधव व अरुण पाटील यांनी काल रविवारी रात्री दुचाकीवरून शहरातील रस्त्यांचा पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांना सर्वच ठिकाणी सिमेंट, वाळू, खडी यांचे मिश्रण टाकून अत्यंत चुकीच्या पद्धतीने खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी सोबत असलेल्या संबंधित कंत्राटदाराला त्यांनी जाब विचारला असता त्याने स्वतः देखील खड्डे बुजवण्याची ही पद्धत चुकीची असल्याचे मान्य केले.
खरंतर रस्त्यावरील खड्ड्यांचे पेव्हर्स घालून काँक्रिटीकरण केले गेले पाहिजे तरच ते टिकते. मात्र अधिकाऱ्यांचा आदेश असल्यामुळे आपल्याला असे करावे लागत असल्याची प्रांजळ कबुली त्याने दिली. ते कोण महामंडळाचे पदाधिकारी देखील चकित झाले. तसेच काहीही असो रस्त्यावरील खड्ड्यांची व्यवस्थित डागडुजी झालीच पाहिजे, असे त्यांनी कंत्राटदाराला बजावले.