बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरात मालमत्तेची अपार हानी झाली असून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ यांनी आज मतदारसंघाचा दौरा करून ठिकठिकाणी झालेल्या हानीची पाहणी केली.
बेळगाव उत्तर मतदार संघातील बसवन कुडची, अलारवाड, बी. के. कंग्राळी आणि कॅम्प प्रदेश या भागांना आज शुक्रवारी सकाळी भेटी देऊन आमदार शेठ यांनी तेथे पावसामुळे झालेल्या मालमत्तेच्या हानीची पाहणी केली. पावसामुळे पूर्णपणे कोसळलेल्या घरांची यादी तयार करून नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.
तसेच याबाबतीत दुर्लक्ष अथवा विलंब केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आमदार असिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांना दिला. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
त्यामुळे वाहनांच्या संचारात अडथळा निर्माण होऊन वाहन चालकांना त्रास होत असल्यामुळे सदर खड्डे युद्धपातळीवर तात्पुरते बुजवण्यात यावेत, अशी सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना केली.
याप्रसंगी आमदारांचे सुपुत्र अमन सेठ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्या दरम्यान अधिकाऱ्यांनी आमदार असिफ (राजू) सेठ यांना पावसामुळे झालेल्या हानीची संपूर्ण माहिती दिली.