Thursday, November 14, 2024

/

अज्ञान, अंधश्रद्धा दूर झाल्यास साप बनू शकतो मनुष्याचा मित्र -चिट्टी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आपल्या पर्यावरणाच्या साखळीत सापालाही महत्त्वाचे स्थान असल्यामुळे त्याचे संरक्षण झाले पाहिजे. सापाबद्दलचे भय, अंधश्रद्धा, अज्ञान आणि गैरसमज दूर झाल्यास साप हा मनुष्याचा मित्र होण्यास वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे महिलांनीही सर्पमित्र बनण्यास पुढाकार घ्यावयास हवा, असे मत आनंद आणि शिवानी चिट्टी या सर्पमित्र दांपत्याने व्यक्त केले.

नागपंचमी सणानिमित्त आज गुरुवारी सापाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. आनंद चिट्टी म्हणाले की, सापाबद्दलचे भय, अंधश्रद्धा, अज्ञान आणि गैरसमज दूर होऊन वेगाने सापाला आपला मित्र बनवायचे असेल तर प्रामुख्याने महिलांनी पुढाकार घेणे अधिक गरजेचे आहे.

त्यासाठीच मी स्वतः माझ्या पत्नीला सर्पमित्र बनवले आहे. आजच्या नागपंचमीच्या निमित्ताने मला सांगावेसे वाटते की सापाबद्दलचे गैरसमज दूर होणे अतिशय गरजेचे आहे. हे गैरसमज दूर झाले अज्ञान दूर झाले तर साप हा मनुष्याचा मित्र होण्यास वेळ लागणार नाही. साप त्याला डिवचल्या खेरीज स्वतःहून विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचे आपण ज्ञान करून घेतल्यास अज्ञान दूर होते, भीती दूर होण्यास वेळ लागत नाही. हे सापांच्या बाबतीतही झाले पाहिजे अन्यथा आपण त्यांच्या बाबतीत भयमुक्त होणार नाही. तसे पाहता सर्पदंशापेक्षा अपघात, व्यसनाधीनता आणि एकमेकांच्या जीवावर उठल्यामुळे अनेकांचा मृत्यू होत असतो.

तथापि सापाला विनाकारण बदनाम केले जाते. आपल्या देशात आजही साप चावल्यानंतर जवळपास 50 ते 60 टक्के लोकांचा मृत्यू हा घाबरल्यामुळे, चुकीचे उपचार केल्यामुळे आणि अज्ञानामुळे होतो हे लक्षात घेतले पाहिजे. सरपंच झाल्यानंतर योग्य वेळी योग्य उपचार झाले पाहिजेत. सर्पदंश झालेल्याला मंदिर मशिदीमध्ये नेणे, झाडपाला वगैरे चुकीचे उपचार करणे, तंत्र-मंत्र करणाऱ्यांकडे नेणे अशा गोष्टी करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी सिव्हिल हॉस्पिटल वगैरे सारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये संबंधित रुग्णाला दाखल करावे आज नागपंचमी दिवशी आपण नागाची पूजा करतो.Snake  friend couple

मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात दररोज अगणित सापांची भय आणि अज्ञानापोटी हत्या केली जाते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मनुष्य तसेच इतर जीवांप्रमाणे सापाला देखील जगण्याचा अधिकार आहे असे सांगून आपल्याला सापाला खरोखर देव मानायचे असेल तर त्यांचे संरक्षण संवर्धन झाले पाहिजे. पर्यावरणात सापाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणे. तसेच आपल्या आसपासच्या परिसरात कोणत्या जातीच्या विषारी -बिनविषारी सापांचा वावर आहे. त्यांना आपल्यापासून कसे दूर ठेवावे, ते चावल्यास कोणते प्रथमोपचार आवश्यक आहेत हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे आनंद चिट्टी यांनी स्पष्ट केले.

सर्पमित्र शिवानी आनंद चिट्टी यांनी महिलांच्या बाबतीतील सापांबद्दलच्या गैरसमजाबाबत माहिती देताना सांगितले की, समाजात सापाविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. त्यापैकी महिलांच्या बाबतीतील प्रमुख अंधश्रद्धा म्हणजे गर्भवती महिलेने सापा समोर जाऊ नये. तसे झाल्यास तिचे जन्मणारे बाळ सापाप्रमाणे जिभ काढत आणि संबंधित सापाचे डोळे जातात असे म्हटले जाते. मात्र आमच्या स्वानुभवानुसार आम्ही साप पकडताना अनेकदा गर्भवती महिला देखील उपस्थित असतात, मात्र त्यांच्या बाबतीत तसे काही घडल्याचे आमच्या निदर्शनास आलेले नाही. सर्पदंश झालेल्या व्यक्तीजवळ महिलांनी जाऊ नये किंवा साप दिसला की महिलांनी काकणांचा आवाज करू नये असे म्हटले जाते. मात्र त्यातही काही तथ्य नाही.

कारण माझे पती आनंद चिठ्ठी यांना आजपर्यंत सुमारे 23 वेळा सर्पदंश झाला आहे आणि तेंव्हा बहुतांश वेळा महिला डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीजवळ महिला गेल्यास त्याच्या अंगातील विषाची तीव्रता वाढते हा समज चुकीचा आहे हे स्पष्ट होते. आज सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. तथापी आम्ही साप पकडण्यास जातो त्यावेळी घरामध्ये लहान मुले, महिला आहेत असे सांगितले जाते. थोडक्यात यातून महिला घाबरट असल्याचे सूचित केले जाते आणि म्हणूनच महिलांच्या बाबतीतील हा समज चुकीचा ठरवण्यासाठी व महिलाही निधड्या छातीच्या असतात हे दाखवण्यासाठी मी या साप पकडण्याच्या क्षेत्रात आले, असे शिवानी शेट्टी यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.