बेळगाव लाईव्ह : बाहेरचा उमेदवार असा शिक्का घेऊन निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच स्थानिक राजकारण्यांच्या आणि नागरिकांच्या रोषाला सामोरे गेलेल्या खास. जगदीश शेट्टर यांनी बेळगावच्या पत्त्यावर शिक्कामोर्तब करून विरोधकांना तात्पुरते शांत केले. आता निवडणुका पार पडून काही महिनेच उलटले असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी घेतलेले बेळगाव शहरातील कुमारस्वामी ले-आऊटमधील आपले भाड्याचे घर त्यांनी रिकामे केले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पत्नी आणि मुलासह बेळगावला आलेल्या शेट्टर यांनी भाड्याच्या घरात राहण्यापूर्वी पूजा वगैरे करून विधिवत गृहप्रवेश केला होता. निवडणूक प्रचारादरम्यान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शेट्टर यांच्या बेळगाव रहिवासी म्हणून त्यांच्या स्थानिक पत्त्यावर शंका उपस्थित केली होती. याला उत्तर देताना शेट्टर यांनी बेळगावमध्ये कायमस्वरूपी पत्ता स्थापन केल्याचे ठामपणे सांगितले होते.
बेळगावचे नवे खासदार जगदीश शेट्टर यांनी आपल्या या निर्णयानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना “मी कायमस्वरूपी घर बांधण्याच्या उद्देशाने बेळगावमध्ये जागा शोधत आहे. मी शक्य तितक्या लवकर जागा विकत घेईन आणि घर बांधण्यास सुरुवात करेन. स्वत:ला लोकांपर्यंत पोहोचवता यावे यासाठी मी आठवड्यातून 3 ते 4 दिवस बेळगाव येथे राहून प्रत्येक तालुक्याला भेट देण्याची योजना आखली आहे, असे स्पष्ट केले होते.
तथापी आता खासदार शेट्टर यांची भाड्याचे घर रिकामी करण्याची कृती आणि बेळगावमध्ये कायमस्वरूपी निवासस्थान बांधण्याची त्यांची योजना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या महिन्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाप्रसंगी खासदार जगदीश शेट्टर यांनी सभागृहात बेळगावचे मुद्दे मांडले होते मात्र हे करत असताना त्यांनी हुबळी धारवाडच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला होता. त्यामुळे बेळगावातील लोकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती.
वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे बेळगावपर्यंत आणण्यामध्ये खासदार शेट्टर यांना अपयश आले आहे. आता यात भर म्हणून त्यांनी बेळगावातील आपले भाड्याचे घर रिकामी केल्यामुळे ‘बेळगावचे रहिवाशी’ या त्यांच्या बाबतीतील मुद्द्याला पुन्हा तोंड फुटले आहे.