बेळगाव लाईव्ह : विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने निर्णय घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांत सुसंवाद असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. उदय पाटील यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते तर व्यासपीठावर अनिल मंडोळकर ( सी.ए) , शिवाजी विद्यापीठाचे डॉ. नवनाथ वालेकर, राहूल पाटील ( आयआरएस) ,कार्याध्यक्ष शिवराज पाटील, दीपक किल्लेकर व शितल वेसणे उपस्थित होते .
यावेळी बोलताना डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयापासून लांब रहावे व राजकारणी लोकांच्या मागे धावू नये असा मौलिक सल्लाही दिला तर अनेक क्षेत्रात करियर करू शकता त्यासाठी ध्येय निश्चित करण्याची गरज असून परिस्थितीला एक संधी समजा असे मत डॉ. वालेकर यांनी व्यक्त केले.
आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना प्रेरणा स्रोत समोर ठेवून वाटचाल करा.संधी खूप आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राहूल पाटील यांनी केले. यावेळी अंजली अष्टेकर ( सी. ए.) व शिवम मंडोळकर ( सी.ए.) यानीही आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धवल यश मिळविलेले राहूल पाटील, सनदी लेखापाल( सी.ए.) परीक्षेत यश मिळवल्याबद्दल शिवम मंडोळकर, अंजली अष्टेकर, तेजस्विनी कंग्रालकर व जिवणू शहापूरकर तसेच दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेल्या 122 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन डॉ उदय पाटील यांनी तर म.जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीचे पूजन अनिल मंडोळकर यांनी केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन खजिनदार के.एल.मजूकर यांनी केले तर आभार सहचिटणीस संग्राम गोडसे यांनी मांडले यावेळी पालक, विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.