बेळगाव लाईव्ह :शिक्षक या नात्याने ज्ञानदानाच्या क्षेत्रातील सुमारे 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल आयोजित केलेला मुतगा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. अंजूदेवी शिवाजी केदनुरकर यांचा सत्कार समारंभ आज शनिवारी भावपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडला.
मुतगा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) लीलावती हिरेमठ उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती शिक्षिका ए. एस. अर्थात अंजूदेवी शिवाजी केदनुरकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे एसडीएमसी सदस्य उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित यांचे स्वागत आणि प्रास्ताविक एस. जी. करंबळकर यांनी केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी शाळेतील शिक्षकांच्यावतीने तसेच विविध संघ -संस्थांतर्फे सेवानिवृत्तीबद्दल शिक्षिका अंजूदेवी केदनुरकर यांचा पुष्पहार घालून तसेच शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कारानंतर शिक्षिका एस. व्ही. नावलगी यांच्यासह इतरांची शिक्षिका केदनुरकर यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ या शिक्षिका अंजूदेवी यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हणाल्या की, शिक्षिका ए. एस. केदनुर या अतिशय शांत स्वभावाच्या आणि पोळ्यातील मधमाशा ज्याप्रमाणे शांतपणे आपापले काम करण्यात व्यस्त असतात तसे काम करणाऱ्या शिक्षिका आहेत. जास्त न बोलता शांतपणे आपले कर्तव्य पार पाडण्याचा त्यांचा स्वभाव मला नेहमी भावायचा. खरंतर ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक हे परिश्रमपूर्वक काम करणारे असतात. त्यापैकीच एक असणाऱ्या केदनुरकर यांनी आमच्या खात्याला अभिमान वाटावा अशी अशी सेवा दिली आहे. माझी डीडीपीआय पदी नियुक्ती झाली आणि ग्रामीण भागातील शिक्षकांना स्वतःच डीडीपीआय झाल्या सारखा आनंद झाला.
माझ्या नियुक्तीमुळे डीडीपीआय कार्यालयात येताना बिचकणारे शिक्षक आता निर्धास्तपणे कार्यालयात ये -जा करू लागले आहेत. खरंतर असेच दडपणाखाली न राहता शिक्षकांनी पारदर्शी, मुक्त राहिले पाहिजे तरच चांगले प्रशासन देणे शक्य होते. शिक्षकांबरोबरच एसडीएमसी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असे अनेक जण मला फोन करतात. बहुतेक माझ्यावरील विश्वासापोटी हे होत असावं. मी त्यांचा विश्वास फोल ठरू देणार नाही. कार्यक्रमास येण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून बेळगाव जिल्ह्याचा शैक्षणिक इतिहास खूप चांगला आहे. जर आपण समस्त गावकरी, शाळा, शिक्षक, पालक अशा सर्वांनी मनात आणलं तर गुणवत्तेत बेळगाव जिल्हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा शैक्षणिक जिल्हा होऊ शकतो. यासाठी मला सर्वांचे सहकार्य हवे आहे. शिक्षिका ए. एस. केदनुरकर यांच्या निवृत्तीचा समारंभ असला तरी तुम्ही तो एखाद्या सणाप्रमाणे साजरा करत आहात हे आमच्या संस्कृतीचे एक प्रतीक आहे. यातून आपण सत्कार मूर्तीबद्दलचा प्रेम अभिमान आदर व्यक्त करत असतो असे सांगून जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी शेवटी पुन्हा एकदा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
सत्कार समारंभास उमेश पुरी, नारायण कणबरकर, कृष्णा पाटील, प्रभाकर तळवार, मुख्याध्यापिका ए. ए. पाटील, ग्रा. पं. सदस्य किरण पाटील, भालचंद्र पाटील, सुधीर पाटील, प्रभाकर पाटील, श्रीमती के. डी. पाटील, चंद्रकांत चिगरे, लीना जाधव, सी. के. मिरजकर, मारुती पाटील, महादेव पाटील, बी. एम. घसारी, कुशकुमार देसाई, एम. आर. पाटील आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक महेश इटगीकर यांनी केले.
सत्कार समारंभनंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना सत्कारमूर्ती शिक्षिका सौ. अंजूदेवी शिवाजी केदनुरकर यांनी आपल्या आजवरच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा बाळेकुंद्री खुर्द येथून 22 सप्टेंबर 1984 रोजी मी माझ्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली.
त्यानंतर एम.एच.पी.एस. खादरवाडी शाळेमध्ये, पुढे सरकारी मॉडेल स्कूल सांबरा येथे ज्ञानदानाचे कार्य केले. आता सरकारी उच्च प्राथमिक शाळा मुतगा येथे गेल्या 13 जून 2009 पासून कार्यरत होते असे सांगून या पद्धतीने गेल्या सुमारे 30 वर्षाच्या शिक्षकी पेशाच्या कार्यकाळात मला 2005 -06 मध्ये बेळगाव तालुकास्तरीय आदर्श शिक्षिक पुरस्कार, 2015 -16 मध्ये आदर्श फाउंडेशनकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार, 2021 -22 मध्ये गुरु स्पंदन मराठा संघातर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार, त्यानंतर अलीकडे 2022 -23 मध्ये एमएचपीएस शाळेमध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, अशी माहिती शिक्षिका सौ. अंजूदेवी केदनुरकर यांनी दिली.