Thursday, January 2, 2025

/

मोबाईल, सोशल मीडियाला दूर ठेवल्यास विद्यार्थ्यांना यश -राहुल पाटील

 belgaum

बेळगाव लाईव्ह:केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी, जिद्द, चिकाटी याबरोबरच शिस्त सर्वात महत्त्वाची असते. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन आणि सोशल मीडियापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे असते, असे मार्गदर्शनपर विचार यंदाच्या यूपीएससी परीक्षेत धवल यश मिळवणारा बेळगाव तालुक्यातील कलखांब गावचा सुपुत्र राहुल पाटील याने व्यक्त केले.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल राहुल पाटील यांचा काल मराठा समाज सुधारणा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर राहुल पाटील याने बेळगाव लाईव्हशी देखील संवाद साधला. आपल्या यूपीएससी परीक्षेतील यशाचे गमक स्पष्ट करताना माझे आई-वडील, भाऊ-बहीण यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन हे माझ्या यशाचे गमक आहे. त्यांचा जर पाठिंबा नसता तर प्रारंभीच चार वेळा आलेल्या अपयशा वेळीच मी यूपीएससी परीक्षेचा नाद सोडला असता, असे त्याने सांगितले.

यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करायला हवं? याबद्दल बोलताना राहुल पाटील म्हणाला की, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी सोबतच शिस्त ही फार महत्त्वाची आहे. मोबाईल वगैरे सर्व मोह बाजूला सारून शिस्तबद्धरीत्या या परीक्षेची तयारी केल्यास आपल्याला निश्चितपणे यश मिळू शकते.

या परीक्षेची तयारी करण्यासाठी विशेष करून सोशल मीडियापासून दूर राहणे गरजेचे आहे. मी स्वतः मी स्वतः मोबाईल आणि सोशल मीडियापासून शक्यतो दूर रहात होतो. सदर परीक्षेची तयारी आपण काॅलेज जीवनापासून किंवा त्यानंतर देखील करू शकता. मी माझी तयारी कॉलेज जीवनानंतर सुरू केली.

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवातीला इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके वाचून अभ्यास करावा लागतो. कारण यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठीची ही मूलभूत (बेसिक) पुस्तके असून यातीलच बहुतांश अभ्यासक्रम परीक्षेला असतो. याबरोबरच महाविद्यालयीन कला शाखेच्या इतिहास, भूगोल, समाजशास्त्र वगैरे पुस्तकांसह इतर आवश्यक पुस्तकांचा चांगला अभ्यास करावा लागतो.Rahul patil upsc

यूपीएससीच्या प्राथमिक (प्रिलिमिनरी) आणि प्रमुख (मेन) अशा दोन वेगळ्या परीक्षा असतात. या परीक्षांसाठी आपल्याला वेगवेगळी रणनीती अवलंबावी लागते. यापैकी प्राथमिक परीक्षा एमसीक्यू आधारित परीक्षा असते. ही परीक्षा इतकी कठीण असते की या परीक्षेतच जवळपास 99 टक्के विद्यार्थी बाद होतात. प्रमुख परीक्षेसाठी लिहिण्याचा सराव चांगला असावा लागतो आणि सादरीकरण महत्त्वाचे असते. यानंतर मुलाखतीचा टप्पा असतो. मुलाखतीमध्ये तुमचं ज्ञान वगैरे गोष्टींपेक्षा तुमचे संवाद कौशल्य, सादरीकरण, तुमचा आत्मविश्वास आणि देहबोली (बॉडी लँग्वेज) याला खूप महत्त्व असतं.

मला यावेळी आयएएस सर्व्हिस मिळाली नाही. सिव्हिल आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसला संधी मिळाली आहे. परंतु मला आयएएस अधिकारी बनायचे आहे. त्यासाठी मला यूपीएससी परीक्षेमध्ये पहिल्या 100 जणांच्या यादीत स्थान मिळावे लागेल आणि आता त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे राहुल पाटील याने शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.