बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी मंगळवारी के. एल. इ. संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन महिलांच्या समस्या जाणून घेत अशा समस्या सोडवण्याच्या पद्धतींबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थिनी व शिक्षिकांना कर्तव्य बजावत असताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून लैंगिक छळासह काही अडचणी आल्यास तत्काळ पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
स्थानिक पातळीवर या समस्येवर पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास थेट महिला आयोगाला माहिती द्यावी, असे डॉ.नागलक्ष्मी चौधरी यांनी सांगितले. आधुनिक काळात महिलांवरील अत्याचाराच्या विविध प्रकारांची माहिती देताना त्या म्हणाल्या, सरकारने प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी विविध यंत्रणा तयार केल्या आहेत. त्यामुळे याचा लाभ घेऊन संरक्षण मिळवावे.
यावेळी बोलताना एपीएमसी स्थानकाचे पी.एस.आय. त्रिवेणी म्हणाल्या, महिलांनी सोशल मीडियाबाबत खूप जागरूक राहण्याची गरज आहे. अन्यथा विभागातील विविध प्रकरणे उघडकीस आणून भीतीने जगण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
यावेळी झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आयोगाच्या अध्यक्षा डॉ.नागलक्ष्मी म्हणाल्या की, महिलांनी शैक्षणिक संस्था किंवा कामाच्या ठिकाणी अत्याचार झाल्यास, अशा प्रकरणी न्याय न मिळाल्यास जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. स्थानिक पातळीवर न्याय न मिळाल्यास महिला आयोगाला थेट माहिती दिल्यास आयोग तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.