बेळगाव लाईव्ह :आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे गेल्या मंगळवारपासून श्रीकृष्ण कथा महोत्सवास प्रारंभ झाला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या महोत्सवात भजन, कीर्तन याबरोबरच सायंकाळी कथाकथन व महाप्रसाद झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी आणि बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी आपल्या रसाळ वाणीत श्रीकृष्ण कथानकास प्रारंभ केला.
हा महोत्सव 27 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे .
“काल आपण भगवान बलराम यांच्या जन्माची कथा ऐकली” असे सांगून ते म्हणाले की “श्रवण, कीर्तन हा कोणत्याही उत्सवाचा मुख्य भाग असतो. अनेक भक्त वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात पण त्यामध्ये श्रवण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून श्रीकृष्ण कथा सादर करतो .
श्रीमद् भागवत च्या दहाव्या स्कंधात 90 अध्याय असून त्यापैकी 54 अध्याय आतापर्यंत आपण पूर्ण केले आहेत. आता 55 वा अध्याय सुरू होत आहे” असे सांगून ते म्हणाले की “भगवान श्रीकृष्ण यांनी या पृथ्वीतलावर 125 वर्षे लीला केल्या. त्यांच्या लीलामध्ये बाललीला, पौगंड दिला, ऐश्वर्या लिला अशा अनेक लीलांचा समावेश आहे. साधारण साडेदहा वर्षापर्यंत ते वृंदावन मध्ये राहिले.
त्यानंतर त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षापर्यंत मथुरा येथे आपल्या लीला केल्या त्यानंतर सुमारे शंभर वर्षे त्यांनी द्वारका मध्ये लीला केल्या. त्यामुळे त्यांच्या या द्वारकालीला अतिशय महत्त्वाच्य आहेत” अशी माहिती देऊन त्यानी द्वारके मध्ये भगवंतानी केलेल्या अनेक लीला प्रस्तुत केल्या ,ज्यामध्ये भगवंतांचा रुक्मिणीबरोबर चा विवाह याचाही समावेश होतो.